Corona Virus: राज्यात कोरोना लस घेतलेल्या 35 जणांना डेल्टा प्लसची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 10:29 AM2021-08-26T10:29:19+5:302021-08-26T10:30:19+5:30
Corona Virus Delta Plus in Maharashtra: राज्यातील या १०३ रुग्णांपैकी १७ जणांचे लसीचे दोन्हीही डोस झालेले आहेत तर १८ जणांनी केवळ एक डोस घेतलेला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात डेल्टा प्लसच्या रुग्णांनी शंभरी पार केली आहे. आतापर्यंत १०३ रुग्णांचे निदान झाले आहे. डेल्टा प्लस विषाणू अधिक संसर्गकारक असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. डेल्टा प्लस बाधा झालेल्यांपैकी १७ जणांनी लसीचे दोन्ही तर १८ जणांनी एक डोस घेतला होता.
राज्यातील या १०३ रुग्णांपैकी १७ जणांचे लसीचे दोन्हीही डोस झालेले आहेत तर १८ जणांनी केवळ एक डोस घेतलेला आहे. लसीकरण झालेल्यांपैकी सात व्यक्तींनी कोव्हॅक्सिन तर इतर २८ जणांनी कोविशिल्ड लस घेतलेली आहे. एकूण रुग्णांपैकी ४९ रुग्ण हे लक्षणेविरहित किंवा सौम्य लक्षणे असणारे असल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्याची गरज भासली नाही. तर १०३ रुग्णांपैकी ९८ रुग्ण कोविड आजारातून बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंतच्या १०३ डेल्टा प्लस रुग्णांपैकी ५६ पुरुष असून ४७ स्त्रिया आहेत.
१०३ रुग्णांपैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात तीन पुरुष तर दोन स्त्री रुग्णांचा समावेश आहे. २ मृत्यू रत्नागिरी जिल्ह्यात तर प्रत्येकी १ मृत्यू बीड, मुंबई आणि रायगड येथे झाला आहे. मृत्यू झालेले पाचही रुग्ण हे ६५ वर्षांवरील असून त्या सर्वांना अतिजोखमीचे आजार होते. या ५ जणांपैकी २ जणांनी कोविशिल्ड लसीचे दोन डोस घेतले होते.
राज्याच्या आरोग्य विभागाचे साथसर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले, विषाणूच्या जनुकीय रचना सतत बदलत आहेत. हा विषाणूच्या नैसर्गिक जीवनक्रमाचा भाग आहे. या संदर्भात भीती न बाळगता कोविडबाबत शासनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
वयोगट - एकूण
डेल्टा प्लस रुग्ण
n० ते १८ वर्षे - १०
n१९ ते ४५ वर्षे - ५५
n४६ ते ६० वर्षे - २५
n६० वर्षांपेक्षा अधिक - १३