राज्यात एक कोटीहून अधिक पशुधन दुष्काळाने बाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 08:01 PM2018-12-15T20:01:47+5:302018-12-15T20:08:45+5:30
परतीच्या पावसाने पाठ फिरविल्यामुळे राज्यात पाणी टंचाई निर्माण झाली.
पुणे: राज्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून सुमारे एक कोटी ३० लाखाहून अधिक पशूधन दुष्काळाने बाधित झाले आहे.पाणी टंचाईमुळे पुढील काळात चारा टंचाईचा सामना करावा लागणार आहे.मात्र,राज्याच्या पशूसंवर्धन संचालक कार्यालयाकडून दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चारा उत्पादनाला प्राधान्य दिले जात असून चारा निर्मितीसाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत.परंतु,पुढील काळात इतर राज्यांमधून चारा आयात करावा लागेल,अशी शक्यता पशूसंवर्धन विभागातील अधिका-यांकडून व्यक्त केली जात आहे.
परतीच्या पावसाने पाठ फिरविल्यामुळे राज्यात पाणी टंचाई निर्माण झाली.त्यामुळे राज्य शासनातर्फे १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला.जिल्हा प्रशासनातर्फे दुष्काळ बाधित नागरिकांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.मात्र,केवळ नागरिकच नाही तर जनावरेही दुष्काळानेबाधित झाली आहेत.पशुसंवर्धन संचालक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार राज्यातील १ कोटी ३३ लाख ३१ हजार १२३ जनावरे बाधित असून या जनावरांसाठी सुमारे दीड कोटी मेट्रिक टन चा-याची आवश्यकता आहे.सध्या १ कोटी १२ लाख मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे.तर पुढील सात महिन्यासाठी १ कोटी ४४ लाख ४२ हजार मेट्रिक टन चा-याची निर्मिती करावी लागणार आहे.
राज्य शासनातर्फे चारा निर्मितीसाठी विविध उपाय योजना केल्या जात असून शेतक-यांना चारा उत्पादनासाठी १० कोटी रुपये निधीचे वाटप केले आहे.तसेच शासनाकडून चारा निर्मितीसाठी आणखी २५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून त्यातील १२.५ कोटी रुपयांचे वितरण डिसेंबर महिना अखेरपर्यंत केले जाणार आहे. शासनाकडून दहा गुंठे गाळपेर जमिनीमध्ये चारापिके घेण्यासाठी बियाणे आणि खतासाठी 460 रुपये अनुदान दिले जात आहे. त्याचप्रमाणे २ हेक्टरमध्ये चारा पिक घेतल्यास ४ हजार ६०० रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. तसेच सर्व जिल्हाधिका-यांनी आपल्या जिल्ह्यात सुमारे २ हजार टन ज्वारी,मका आदी चारा पिकांचे उत्पादन घ्यावे,अशा सूचना शासनातर्फे देण्यात आल्या आहेत.तसेच ८५ लाख हेक्टर गाळपेर क्षेत्रावर चारा पिके घेण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे.
पसूसंवर्धन संचालक कार्यालयातील वैरण विकास विभागाचे उपसंचालक गणेश देशपांडे म्हणाले, राज्य शासनातर्फे चारा निर्मितीसाठी आत्तापर्यंत राज्यात १० कोटी रुपयांच्या निधीचे वितरण करण्यात आले आहे.पुढील काही दिवसात आणखी २५ कोटींचे वितरण केले जाणार आहे. वन विभाग,आदिवासी विभाग,कृषी विद्यापीठ, साखर आयुक्तालय यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात चा-याचे उत्पादन घेण्याबाबत पत्र देण्यात आले आहे.
..............
दुष्काळाने बाधित झालेल्या तालुक्यातील पशुधनाची आकडेवारी
* लहान पशूधन - ३७ लाख २८ हजार ३९५
* मोठे पशूधन - ९६ लाख २ हजार ७२८
एकूण बाधित पशूधन - १ कोटी ३३ लाख ३१ हजार १२३
-----------
पुढील काळात उपलब्ध होणारा चारा
* कृषी पिकांचे अवशेष : ९८.८९ लाख मेट्रिक टन
विविध योजनातून उपलब्ध चारा:११.२० लाखे मेट्रिक टन
शासकीय जमिनीतून उपलब्ध चारा ००.०७ लाख मेट्रिक टन
---------
एकूण उपलब्ध होणारा चारा १ कोटी १० लाख १६ हजार मेट्रिक