पुण्यातील अग्निशमन जवानाची साता-यातील आगीवर मात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 09:28 PM2017-10-17T21:28:24+5:302017-10-17T22:56:36+5:30
सातारा येथील महामार्गानजीक असलेल्या लिंबगाव फाटा येथे हॉटेल सोहमच्या किचनमध्ये तेलाचा भडका होऊन मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास आग लागली.
पुणे : सातारा येथील महामार्गानजीक असलेल्या लिंबगाव फाटा येथे हॉटेल सोहमच्या किचनमध्ये तेलाचा भडका होऊन मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास आग लागली. आग लागताच नागरिकांनी सातारा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाशी संपर्क करून मदतीची मागणी केली.
परंतु लिंबगावापासून नगरपालिकेचे अग्निशमन केंद्राचे अंतर बरेच असल्याने मदत पोहोचण्यास वेळ लागेल, असे वाटल्याने तेथील नागरिकांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यावेळी साता-याच्या आणेवाडीचा रहिवासी असलेला पुणे अग्निशमन दलाचा जवान राजीव टिळेकर हा नुकताच दिवाळीची सुट्टी नसल्याने थोड्या वेळाकरिता कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावी गेला होता व हा जवान आग लागलेल्या ठिकाणांहून पाचच मिनिटांच्या अंतरावर होता. तिथे अचानक त्याला त्याच्या मित्राने फोन करून आग लागल्याची बातमी दिली. जवान टिळेकर यांनी क्षणाचाही विलंब न करता आगीच्या ठिकाणी धाव घेतली.
जवान टिळेकर हे हॉटेल सोहम येथे पोहोचताच त्यांना किचनमध्ये आग भडकत असल्याचे दिसले. त्यांनी लगेचच हॉटेलमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करताच त्यांना स्थानिक पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने मज्जाव केला. त्याचवेळी जवान टिळेकर यांनी पुणे अग्निशमन दलाचा मी एक जवान असल्याचा पुरावा म्हणून पोलिसांना ओळखपत्र दाखवत नगरपालिकेची फायरगाडी येईपर्यंत शक्य तेवढा प्रयत्न करू, असे सांगितले. जवान टिळेकर यांची ओळख पटताच पोलिसांनी त्यांना काळजी घेण्याच्या सूचना देत आगीवर नियंत्रण मिळवण्याकरिता पुढे जाण्याची परवानगी दिली.
जवान टिळेकर यांच्या धाडसाची व चतुराईची हीच वेळ होती. कारण ना फायरगाडी ना तिथे आग विझवण्याचे कुठलेच साधन... ! मग त्यांनी धाडसाने जोखीम स्वीकारत पुणे अग्निशमन दलाच्या त्राणाय सेवामहे या ब्रीदवाक्यानुसार आग लागलेल्या किचनमधील तीन सिलिंडर आत जाऊन एकट्याने बाहेर काढले. तसेच किचनने पेट घेतलेल्या ठिकाणी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बादलीच्या साह्याने पाण्याचा मारा करत आग नियंत्रणात आणली. त्याचवेळी सातारा नगरपालिका व एका साखर कारखान्याची फायरगाडी दाखल झाली. या आगीत हॉटेलचे नुकसान झालेच. परंतु जवान टिळेकर यांनी दाखवलेल्या जिगरबाज कामगिरीमुळे जीवितहानी अथवा कोणी जखमी झाले नाही. कारण जर वेळेवर तीन सिलिंडर बाहेर काढले नसते तर सिलिंडरचे स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली असती. जवान राजीव टिळेकर यांनी केलेल्या कामगिरीने स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांनी त्यांचे कौतुक केले, पुणे अग्निशमन दलाकडे असे जिगरबाज जवान असल्याचेही त्यांनी नमूद केले.