आई वडिलांना तिला कचऱ्याच्या डब्यात सोडले, दृष्टी गमावली; परिस्थितीवर मात करत माला झालीय अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 18:39 IST2025-04-23T18:33:47+5:302025-04-23T18:39:25+5:30
परिस्थितीवर मात करत दिव्यांग माला पापळकरने एमपीएससी परीक्षेत यश मिळवले आहे.

आई वडिलांना तिला कचऱ्याच्या डब्यात सोडले, दृष्टी गमावली; परिस्थितीवर मात करत माला झालीय अधिकारी
Mala Papalkar Success Story: गेल्या आठवड्यात, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एकत्रित गट क परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला आणि यादीत अमरावती येथील माला पापळकर यांचाही समावेश होता. माला पापळकर आज प्रत्येक दिव्यांग व्यक्तीसाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे. कारण ती दृष्टिहीन असूनही, तिने अशी गोष्ट मिळवलीय जी बरेच लोक अनेक प्रयत्न करुनही मिळवू शकत नाहीत. महत्त्वाची बाब म्हणजे २५ वर्षांपूर्वी माला पापळकर जळगाव रेल्वे स्थानकावर कचऱ्याच्या डब्यात सापडली होती. तिथपासून आजपर्यंतच्या प्रवासात तिने अडचणींवर मात केलीय.
मालाने एमपीएससी २०२३ ची परीक्षा दिली होती, ज्याचा निकाल २२ महिन्यांनी जाहीर झाला. नियुक्ती पत्र मिळाल्यानंतर, २६ वर्षीय माला लवकरच नागपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून रुजू होणार आहे. दृष्टिहीन असलेल्या मालाला तिच्या पालकांनी बालपणीच सोडून दिले होते आणि ती एका अनाथाश्रमात मोठी झाली.
जळगाव रेल्वे स्थानकावर कचऱ्याच्या डब्यात माला सापडली होती. रिमांड होममध्ये ठेवल्यानंतर तिला अमरावती येथील पद्मश्री पुरस्कार विजेते आणि सामाजिक कार्यकर्ते शंकर बाबा पापळकर यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. त्यानंतर वज्जर येथील त्यांचा आश्रम मालाच्या मोठ्या स्वप्नांचा पाया रचला गेला. महिला आणि बालविकास विभागाने मालाला शंकर बाबांसोबत ठेवल्यानंतर तिला सरकारी कागदपत्रांमध्ये सामाजिक कार्यकर्त्याची मुलगी अशी ओळख मिळाली. जेव्हा माला आश्रमात आली तेव्हा ती खूप लहान होती आणि तिला दिसत नसल्याचे समोर आले. तिची दृष्टी फक्त ५ टक्के होती आणि ती शारीरिकदृष्ट्या कमकुवत होती.
मालाचे नाव स्वामी विवेकानंद अंध शाळेत नोंदवण्यात आले आणि नंतर तिने अमरावतीतील भिवापूरकर अंध शाळेत शिक्षण घेतले. त्यानंतर मालाने विदर्भ कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. प्रकाश टोपल पाटील नावाचे एक थोर गृहस्थ मालाच्या कॉलेजची फी आणि इतर खर्च करत होते. मालाने सलग १० वर्षे ब्रेल लिपीमध्ये पहिले स्थान मिळवले आहे.
माला २०१९ मध्ये अमोल पाटील यांच्या युनिक अकादमीमध्ये सामील झाली, जी स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यास मदत करते. मात्र लॉकडाऊनमुळे तिला ऑनलाइन अभ्यास करावा लागला. माला अभ्यासात चांगली आहे, पण दृष्टिहीन विद्यार्थ्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. तिला फक्त पुस्तकांमधून वाचता येत नव्हते. त्यामुळे तिच्यासाठी ऑडिओबुक्स शोधाव्या लागल्या आणि अमोल पाटील यांनी यासाठी मेहनत घेऊन ते सगळं केलं. मालाला ऐकता यावे आणि शिकता यावे म्हणून अमोल पाटील कधीकधी स्वतः तिच्यासाठी अभ्यास करुन तो रेकॉर्ड करत होते.
अमोल पाटील यांनी यासाठी मालाकडून कोणत्याही प्रकारचे पैसे घेतले नाहीत. तिच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमीच फोनवर उपलब्ध असायचे. त्यांनी सांगितले की मालाने २०२४ मध्ये एमपीएससी मेन्स उत्तीर्ण केले होती, पण उमेदवारांच्या कौशल्य चाचणीनंतर अंतिम निकाल गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आला. मालाने पुढे जाऊन स्वतः शंकर बाबांची काळजी घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कारण त्यांच्यामुळे ती या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचली आहे.