कोकणात अतिवृष्टी, मराठवाडा कोरडाच
By admin | Published: June 26, 2015 02:25 AM2015-06-26T02:25:50+5:302015-06-26T02:25:50+5:30
मराठवाडा वगळता राज्यात सर्वदूर पडणाऱ्या पावसाचे प्रमाण आता कमी झाले आहे. गेल्या २४ तासांत कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी
पुणे : मराठवाडा वगळता राज्यात सर्वदूर पडणाऱ्या पावसाचे प्रमाण आता कमी झाले आहे. गेल्या २४ तासांत कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडला. विदर्भात पावसाचे प्रमाण कमी झाले, तर मराठवाडा गुरुवारीही कोरडाच होता.
अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे पट्टे सक्रिय झाले आहेत. ते जमिनीच्या दिशेने सरकल्याने महाराष्ट्रात तुफान बरसणाऱ्या मान्सूनचे ढग तिकडे ओढले गेले आहेत. केवळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडत आहे.
गेल्या २४ तासांत गगनबावडा येथे १३० मिमी, इगतपुरी १२०, पुणे-वेल्हा ११०, चंदगड ९०, महाबळेश्वर ८०, सावंतवाडी, आजरा ७०, राधानगरी ६०, चिपळूण, खालापूर, अकोले, पाटण, पुणे-मुळशी, सातारा, शाहूवाडी येथे ५०, कणकवली, कुडाळ, संगमेश्वर, पुणे-भोर, पन्हाळा, पुणे-वडगाव मावळ येथे ४०, कर्जत, माथेरान, पेण, राजापूर, शहापूर, वेंगुर्ला, गडहिंग्लज, शिराळा, साकोली येथे ३०, अंबरनाथ, भिवंडी, दापोली, गुहाघर, कल्याण, महाड, मालवण, माणगाव, पोलादपूर, रोहा, पाली, उल्हासनगर, पुणे-चिंचवड, कोल्हापूर, कराड, पुणे-राजगुरूनगर, सिन्नर, भंडारा येथे २०, अलिबाग, हर्णे, मुंबई, पनवेल, रत्नागिरी, ठाणे, उरण, पुणे-आंबेगाव, दिंडोरी, हातकणंगले, पुणे-जुन्नर, कोपरगाव, निफाड, ओझर, पुणे-पुरंदर, संगमनेर, वाई, इस्लामपूर, चिखलदरा, नागपूर येथे १० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली.