‘भर पावसात दुश्मनी गेली वाहूऩ़़ भगव्या छत्रीखाली नवी मैत्री आली धावून’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 01:11 PM2019-07-04T13:11:09+5:302019-07-04T13:13:34+5:30
माळशिरस तालुक्यात एकत्र वृक्षारोपण
एल. डी. वाघमोडे
माळशिरस : माळशिरस तालुक्यातील दोन कट्टर विरोधी गटातील नेतेमंडळी एका व्यासपीठावर दिसू लागली आहेत. नुकत्याच निमगाव झेडपी गटात झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी खा़ विजयसिंह मोहिते-पाटील व भाजपमधील जुने कार्यकर्ते के़ के़ पाटील यांच्यासह दोन्ही गटाच्या नेतेमंडळींनी भर पावसात भिजत वृक्षारोपण केले. यावरून ‘भर पावसात दुश्मनी गेली वाहूऩ़़ भगव्या छत्रीखाली नवी मैत्री आली धावून’ असेच काहीसे चित्र पाहावयास मिळाले.
झेडपी गट व पंचायत समिती गणात अटीतटीच्या लढती लागत होत्या, त्यावेळी ही नेतेमंडळी एकमेकांविरोधात होती. आता हे नेते पावसात भिजत एका व्यासपीठावर दिसली. वरिष्ठ स्तरावर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आमचं अन् मोहिते-पाटील यांचं ठरलंय पण तालुक्यात या दोन्ही गटाच्या नेतेमंडळींचं झेडपी, पंचायतीचं काय ठरलंय असा प्रश्न आता कार्यकर्ते विचारू लागले आहेत त्यातच दर अडीच वर्षांनंतर होणारी सभापती, उपसभापती पदाची निवड काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. सध्या तरी वनमहोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा दोन्ही गटांनी एकत्र येत वृक्षलागवड केली.
तालुक्यातील मोहिते-पाटील गट व विरोधी गट यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीपासून राजकीय जादू घडली. दोन्ही गटातील नेते धुसफूस करीत का होईना, पण एका व्यासपीठावर दिसू लागले आहेत. निमगाव झेडपी गटात यापूर्वी अनेक निवडणुकांत के. के. पाटील व मोहिते-पाटील समर्थक अशीच लढत होत होती़ विरोधी गटाचे मास्टर मार्इंड के. के़ पाटील व व माजी खा. विजयसिंह मोहिते-पाटील हे एका व्यासपीठावर दिसले नव्हते. त्यामुळे दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमधील संभ्रम कायम होता.
गोरडवाडी (ता. माळशिरस) येथे वृक्षलागवड सप्ताहाच्या उद्घाटन कार्यक्रमात दोन्ही गटांची नेतेमंडळी मांडीला मांडी लावून बसली होती़ कार्यक्रम सुरू होताच रिमझिम पावसालाही सुरुवात झाली़ त्यानंतर या दोन्ही नेतेमंडळींनी वृक्षारोपण केले़ त्यामुळे तालुक्यात याची चर्चा चांगलीच रंगली आहे.