परदेश वाऱ्यांची हद्द झाली
By admin | Published: April 10, 2015 04:04 AM2015-04-10T04:04:16+5:302015-04-10T04:04:16+5:30
सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परदेश वाऱ्यांचा सपाटा लावला आहे. परदेश वाऱ्या करायच्या किती? याला तारतम्य नाही.
सोलापूर : सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परदेश वाऱ्यांचा सपाटा लावला आहे. परदेश वाऱ्या करायच्या किती? याला तारतम्य नाही. १० वर्षांत आघाडी सरकारच्या पंतप्रधानांनी केल्या नाहीत तेवढ्या परदेश वाऱ्या अवघ्या १० महिन्यांत मोदींनी केल्या. यातून काय साध्य झाले, असा सवाल माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गुरुवारी उपस्थित केला.
सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीची गुरुवारी सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक झाली़ या वेळी ते बोलत होते. केंद्र सरकारच्या धोरणांवर सडकून टीका करीत त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन त्यांनी केले.
अच्छे दिन येण्याची स्वप्नं सामान्य माणूस पाहतोय. मात्र, सध्या केंद्र सरकारचे धोरण पाहता सर्वांचा भ्रमनिरास झाला आहे. नरसिंहरावांच्या काळात आर्थिक पुनरुज्जीवनाचा पाया घातला गेला. डॉ. मनमोहन सिंगांनी देशाची अर्थव्यवस्था बळकट केली. काँग्रेसच्या धोरणांमुळेच देशाला आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले. आता विकासाला पैसा नसल्याची ओरड होत आहे. कुठे गेला हा पैसा, असा सवाल करीत शिंदे यांनी देशाच्या आर्थिक स्थितीवर बोट ठेवले. अणुकराराला विरोध करणाऱ्यांनीच अमेरिकन अध्यक्षांच्या समवेत त्याच करारावर थाटात सह्या केल्या, अशी खिल्ली त्यांनी उडवली. (प्रतिनिधी)