अतिउष्णतेने राज्य होरपळले

By admin | Published: May 19, 2016 05:39 AM2016-05-19T05:39:36+5:302016-05-19T05:39:36+5:30

उष्णतेच्या तीव्र लाटेत विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश होरपळून निघाला

Overwhelmingly the state shakes | अतिउष्णतेने राज्य होरपळले

अतिउष्णतेने राज्य होरपळले

Next


नवी दिल्ली/मुंबई/पुणे : उष्णतेच्या तीव्र लाटेत विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश होरपळून निघाला आहे. उष्माघाताने आठ जणांचा बळी गेला असून त्यामध्ये विदर्भातील चार आणि खान्देशातील चौघांचा समावेश आहे. विदर्भात दुपारी अघोषित संचारबंदी लागल्यासारखी परिस्थिती आहे. राज्यात बुधवारी सर्वाधिक ४७.१ अंश सेल्सिअस तापमान अकोला
येथे नोंदवण्यात आले. या भयानक उष्णतेमुळे अकोला जिल्ह्यात सात माकडांचा मृत्यू झाला.
हवामान खात्याने महाराष्ट्राबरोबरच तेलंगणा, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली या भागात केंद्रीय अतिउष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून, ही लाट २१ मेपर्यंत राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. तेलंगणात आतापर्यंत मरण पावलेल्यांची संख्या ३0९ वर गेली आहे. त्यामुळे वैशाख वणव्याने महाराष्ट्र होरपळला असताना, अन्य राज्यांची स्थितीही फारशी वेगळी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याला अपवाद आहे दक्षिण आणि ईशान्य भारतातील राज्यांचा. केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पुडुच्चेरी, आसाम, बंगाल या राज्यात गेल्या २४ तासांपासून पावसाचा कहर सुरू आहे.
>प्रमुख शहरांमधील कमाल तापमान अकोला ४७.१, जळगाव ४६, परभणी
व मालेगाव ४५.२, वर्धा ४५, अमरावती ४४.६, यवतमाळ ४४.४ (अंश सेल्सिअस)
>विदर्भात चौघांचा बळी
विदर्भात सूर्य आग ओकत असल्यासारखी परिस्थिती आहे. एकूणच जनजीवन बेहाल झाले आहे. अकोला जिल्ह्यात उष्माघाताने बुधवारी दोघांचा मृत्यू झाला. गणेश गुलाबराव खंडागळे (वय ५० रा. भांबेरी, ता. तेल्हारा), चंद्रपूर जिल्ह्यातील विरुर येथील श्यामराव गोगुलवार (५५), वर्धा जिल्ह्यातील महेंद्र लोहकरे (५०) अशी मृतांची नावे आहेत. पातूर तालुक्यातील चिखलगाव येथे एका ६५ वर्षाचा व्यक्तीचा मृतदेह आढळला असून त्याचा मृत्यूही उष्माघाताने झाल्याचा कयास आहे. याशिवाय राज्यात उष्णतेने सात माकडांचाही बळी गेला.
खान्देशात चौघांचा मृत्यू
खान्देशातही बुधवारी जळगाव येथे ४७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. धुळ्यात तापमान ४५.६ अंशांवर पोहोचले तर नंदुरबार येथे गेल्या तीन दिवसांपासून पारा ४४ अंशांवर कायम आहे. धुळे जिल्ह्यातील निमगूळ येथील बारीकराव रंगराव बागल (५१) आणि वारुड येथील प्रवीण देवराम चित्ते (३४) आणि जळगाव जिल्ह्यातील कुसुंबा खुर्द येथील गोकूळ शेनफडू पाटील (६७) व रावेरच्या संभाजीनगर भागातील भागवत लालू जगताप (वय ४६) या चौघांचा बुधवारी उष्माघाताने मृत्यू झाला.
आला रे...
मॉन्सून आला..!
तीव्र उन्हामुळे जिवाची काहिली होत असताना संपूर्ण देशासाठी आनंदाची बातमी आहे. नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) निकोबार बेट आणि बंगालच्या उपसागरात बुधवारी दाखल झाला. त्यामुळे आता लवकरच तो केरळमार्गे देशाच्या इतर भागांमध्येही दाखल होण्याची आशा वाढली आहे. पुढील ३ ते ४ दिवसांत मॉन्सूनची आगेकूच होऊन तो अंदमान बेट आणि बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग व्यापेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

Web Title: Overwhelmingly the state shakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.