ज्वेलर्सच्या मालकाला पोलीस कोठडी
By admin | Published: December 27, 2016 01:11 AM2016-12-27T01:11:56+5:302016-12-27T01:11:56+5:30
चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला करणाऱ्या नेरूळ येथील एका प्रसिद्ध ज्वेलर्सचे मालक सुधीरकुमार अक्राकरम याला न्यायायलाने
नवी मुंबई : चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला करणाऱ्या नेरूळ येथील एका प्रसिद्ध ज्वेलर्सचे मालक सुधीरकुमार अक्राकरम याला न्यायायलाने २८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या त्याच्या पत्नीवर डी.वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
नेरुळ सेक्टर १८ येथील सागरदर्शन सोसायटीत राहणाऱ्या सुधीरकुमार याचे दागिन्यांचे दुकान आहे. त्याचे २००७ साली लग्न झाले असून, त्यांना तीन मुले आहेत. परंतु मागील काही दिवसांपासून त्याचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. पत्नीचे तिच्या बालपणीच्या मित्रासोबत प्रेमसंबंध असल्याचा त्याला संशय होता. यावरून त्यांच्यात वाद होत होते. अखेर दोघांमध्ये घटस्फोट घेण्यापर्यंत प्रकरण पोचले होते. त्यामुळे पती-पत्नीतील वाद मिटवून त्यांच्यातील गैरसमज दूर व्हावेत, या उद्देशाने त्यांच्या नातेवाइकांनीही पुढाकार घेतला होता. त्यानुसार दोघा पती-पत्नीत दिलजमाई घडवून आणण्यासाठी २२ डिसेंबर रोजी दोन्ही कुटुंबातील प्रमुख व्यक्तींनी सुधीरकुमारच्या घरी बैठक बोलाविली होती. ही बैठक दिवसभर चालली.
अखेर रात्री चर्चा संपल्यानंतर सुधीरकुमार याने खासगीत बोलण्याच्या बहाण्याने पत्नीला बेडरूममध्ये नेले. परंतु थोड्याच वेळात बेडरूममधून पत्नीच्या ओरडण्याचा आवाज आल्याने घरात उपस्थित असलेल्या नातेवाइकांनी तिच्या मदतीसाठी धाव घेतली. यावेळी बेडरूममध्ये ती रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली दिसून आली. सुधीरकुमारने नारळ सोलायच्या हत्याराने तिच्या डोक्यात व गळ्यावर वार केले होते. हा प्रकार पाहून भयभीत झालेल्या तिच्या नातेवाइकांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. (प्रतिनिधी)