पु. ल. जन्मशताब्दी महोत्सवाचे आज होणार उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 05:59 AM2018-11-08T05:59:59+5:302018-11-08T06:02:51+5:30
पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने गुरुवारपासून पु. ल. जन्मशताब्दी महोत्सव, २०१८ला प्रारंभ होत आहे. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे ८ ते १८ नोव्हेंबर, २०१८ या कालावधीमध्ये पु. ल. जन्मशताब्दी महोत्सव साजरा होणार आहे.
मुंबई : पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने गुरुवारपासून पु. ल. जन्मशताब्दी महोत्सव, २०१८ला प्रारंभ होत आहे. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे ८ ते १८ नोव्हेंबर, २०१८ या कालावधीमध्ये पु. ल. जन्मशताब्दी महोत्सव साजरा होणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे़ खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.
पु. ल. जन्मशताब्दी महोत्सव - २०१८ मध्ये, यंदाचे जन्मशताब्दी वर्ष असलेले महाराष्ट्राचे ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके, ज्येष्ठ गीतकार ग. दि. माडगूळकर आणि लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या विचारावर, कार्यावर व जीवनावर आधारित विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
महोत्सवात होणाऱ्या विविध कार्यक्रमांबरोबरच फोटो, दृकश्राव्य चित्रफिती, रांगोळी व पुस्तकांचे प्रदर्शनही या काळात रसिकांसाठी उपलब्ध होणार आहे. उद्घाटनाच्या दिवशी पु. ल. देशपांडे यांच्या दुर्मीळ भाषणांचा दृकश्राव्य कार्यक्रम
आशय फिल्मस कल्ब आणि पु. ल. कुटुंबीयांच्या वतीने सादर होणार आहे.
या महोत्सवात रांगोळी प्रदर्शनाचे विशेष आकर्षण राहणार आहे़ महोत्सवात आयोजित केलेल्या पुस्तक प्रदर्शनात अनेक नामांकित व लोकप्रिय संस्था सहभागी होणार असून, त्यातून रसिकांना सवलतीच्या दरात पुस्तके उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर पुलंच्या जीवनातील विविध आठवणी ताज्या करणाºया छायाचित्रांचे प्रदर्शनदेखील अकादमीतील कलादालन येथे आयोजित करण्यात आले आहे.
छायाचित्रांच्या प्रदर्शनासोबतच पुलंची निवडक भाषणे, एकपात्री प्रयोग, नाटके व चित्रपट यांच्या दृकश्राव्य चित्रफितीदेखील दाखविण्यात येणार आहेत. पु. ल. जन्मशताब्दी महोत्सव अंतर्गत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमधील रवींद्र नाट्य मंदिराच्या आवारात सादर होणाºया विविध कार्यक्रमांचा आणि प्रदर्शनाचा आस्वाद रसिकांनी
घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केले आहे.