सारांश: मनात देव कोरणारा ‘सरदार’
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 11:34 AM2022-05-15T11:34:08+5:302022-05-15T11:34:57+5:30
भारतात कॅलेंडर कलानिर्मितीचा उल्लेख करायचा झाला तर केरळचे चित्रकार राजा रविवर्मा यांचे नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही.
डॉ. सुभाष देसाई, ज्येष्ठ पत्रकार व लेखक, कोल्हापूर
भारतात कॅलेंडर कलानिर्मितीचा उल्लेख करायचा झाला तर केरळचे चित्रकार राजा रविवर्मा यांचे नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. तीच गोष्ट कोल्हापूरच्या पी. सरदार यांची. सरदार यांच्या नावानेच येथील कॅलेंडर कलेचा इतिहास सुरू झाला. या थोर चित्रकाराने जवळजवळ तीन हजार कॅलेंडर बनवून विक्रमच केला आहे.
पी. सरदार यांचा जन्म १९ मे १९३२ रोजी कोल्हापुरात झाला. त्यांचे मूळ नाव मोहम्मद पटेल. या मुलाचे बालपण हलाखीत गेले. चित्रकलेची आवड होती. त्यांनी शालेय जीवनात अनेक पारितोषिके मिळवली. विसाव्या वर्षी ते मुंबईला गेले. ओळख नसल्याने काही काळ उपाशी राहावे लागले. झोपण्यासाठी फुटपाथचा आश्रय घ्यावा लागला. पण जिद्द, महत्त्वाकांक्षा व मेहनत या जोरावर त्यांनी खूप प्रगती केली. सर्वप्रथम त्यांनी लक्ष्मीचे चित्र बनवले. ते छापून आले आणि त्या लक्ष्मीने आपल्यावर कृपा केली, अशी त्यांची दृढ भावना झाली.
त्यांनी पुढे हजारो देवदेवतांची चित्रे काढली. फिल्मिस्तान, राजकमल सेंटर स्टुडिओ येथे पोस्टर रंगवण्याचे काम केले. त्याचबरोबर कला अध्ययन व पोस्टर निर्मिती चालू ठेवली. त्यांच्या कॅलेंडरला शिवाकाशी व मद्रासमध्ये मोठी मागणी होती. मग ते भारतात प्रसिद्ध झाले. सुबत्ता आली. १९८४ साली त्यांनी युवराज यांच्या कुस्तीचे चित्र काढले. त्या वेळी यशवंतराव चव्हाण यांनी त्यांची खूप प्रशंसा केली. सरदार स्वतः व्यायामपटू होते. त्यांच्या बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर व्यायामाची खास खोली होती. तेथे ते नमाज पढत. हनुमानाची त्यांनी शेकडो चित्रे निर्माण केली. त्यासाठी स्वतःचे शरीर पिळदार बनवले. आरशासमोर ते भिन्नभिन्न मुद्रा करीत व त्या आधारे हनुमानाचे चित्र काढत. त्यांनी मला एकदा सांगितले की, रात्री त्यांना एखादे स्वप्न पडे. त्यात ते काही आकृती पहात. रात्री जाग आल्यावर भिंतीवर ती आकृती ते रेखाटत. मी त्यांना माझ्या सिंह राशीसाठी व्यंगचित्र काढायला लावले. ते सुरेख होते. काही दिवसानंतर ते माझ्याकडे आले आणि म्हणाले, व्यंगचित्रांमुळे माझा कॅलेंडरचा हात बिघडतो. त्यामुळे त्यांनी व्यंगचित्र काढणे बंद केले.
त्यांनी एक-दोन कथा लिहिल्या व आत्मचरित्रात्मक कादंबरी लिहिण्याचा प्रयत्न केला होता. वाचकांच्या पत्रातून ते अधूनमधून डोकावत.
सरदार बावन्न वर्षाचे असताना त्यांना मृत्यूची चाहूल लागली असावी. ते मला म्हणाले, माझा जर अकाली मृत्यू झाला तर मित्र म्हणून कबरस्थानात तुम्ही स्वतः हजर राहा. कारण मी हिंदू देव-देवतांची इतकी चित्रे काढली आहेत की आमच्या समाजातील कर्मठ लोक मला कबरस्थानात जागा द्यायलाही विरोध करतील. त्याच दिवशी त्यांनी आपल्या थोरल्या मुलाला मुंबईला पाठवलं होतं त्याला त्यांनी फोन केला की तू असशील तसा ताबडतोब निघून ये. मुलगा गोंधळला. म्हणाला, पण तुम्हीच तर मला पाठवलं होतं... योगायोग असा की, सरदार यांचा मृत्यूही मे महिन्यात झाला. मी शब्द दिल्याप्रमाणे कबरस्थानात मध्ये गेलो आणि त्यांना शेवटचा सलाम केला.