अतिरिक्त आयुक्तांची पीए अडकली
By admin | Published: July 24, 2014 01:08 AM2014-07-24T01:08:23+5:302014-07-24T01:08:23+5:30
शेतजमिनीच्या वादाचा निकाल देण्यासाठी शेतकऱ्याला ४० हजारांची लाच मागणाऱ्या महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले. टिना ठाकूर असे आरोपी महिलेचे नाव आहे.
२५ हजारांची लाच : एसीबीची कारवाई
नागपूर : शेतजमिनीच्या वादाचा निकाल देण्यासाठी शेतकऱ्याला ४० हजारांची लाच मागणाऱ्या महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले. टिना ठाकूर असे आरोपी महिलेचे नाव आहे. महसूल विभागाचे अतिरिक्त आयुक्त संजयसिंह गौतम यांच्याकडे ती कार्यालय सहायक म्हणून कार्यरत आहे.
वामन झिंगर सहारे (रा. काचूरवाही) यांची १३.१६ हेक्टर आर वडिलोपार्जित शेती आहे. या शेत जमिनीची सहा भावांमध्ये वाटणी झाली होती. वामन सहारे यांच्या नावाने ०.५२ आर जमीन आली. मात्र, त्यांच्या मोठ्या भावाने शेतजमिनीची नोंद आपल्याच नावाने केली. २००५ मध्ये त्यांनी सात बाराचा उतारा मिळवला असता वामन सहारे यांच्या ही धोकेबाजी लक्षात आली. त्यांनी हे प्रकरण तक्रारीच्या रूपाने जिल्हाधिकाऱ्याकडे नेले. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकरणाचा निकाल वामन सहारे यांच्या बाजूने दिला. त्यामुळे त्यांच्या मोठ्या भावाने वरिष्ठ अधिकाऱ्याकडे अपिल केले. सध्याचे अतिरिक्त आयुक्त संजयसिंह गौतम यांच्याकडे या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. त्याबाबत १० ते ११ तारखाही झाल्या होत्या. सहारे यांनी या प्रकरणाचा निकाल कधी लागेल, याबाबत शुक्रवारी गौतम यांच्या कार्यालयात चौकशी केली. यावेळी गौतम यांची कार्यालय सहायक टिना ठाकूरने सोमवारी भेटण्यास सांगितले. सोमवारी (२१ जुलै) टिनाला सहारे भेटले. त्यावेळी प्रकरणाचा निकाल तुमच्या बाजूने लावण्यासाठी ४० हजार रुपये द्यावे लागतील. लाच न दिल्यास निकाल तुमच्या भावाच्या बाजूने दिला जाईल, असे सांगितले.
लाचेचे दोन हप्ते
आपण गरीब शेतकरी आहो. सध्या पेरणी, डवरणीचा हंगाम सुरू आहे, त्यामुळे पैशाची चणचण असल्याचे सहारे यांनी सांगितले. त्यावर तोडगा म्हणून टिनाने ‘आधी २५ हजार द्या, नंतर दुसरा हप्ता १५ हजारांचा दिला तरी चालेल’, असे म्हटले.
पैसे दिल्याशिवाय आपल्या बाजूने निकाल लागणार नाही, याची खात्री पटल्यामुळे सहारेंनी टिना ठाकूरला लाच देण्याची सोमवारी तयारी दाखवली आणि सरळ एसीबीचे कार्यालय गाठले. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. सोमवारी सायंकाळीच शहानिशा करण्यात आली.
‘हे’ साहेब कोण ?
टिना ठाकूर ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात कर्मचारी होती. या प्राधिकरणाशी संबंधित कामाचा अतिरिक्त प्रभार गौतम यांच्याकडे आला. त्यामुळे प्राधिकरणातील काही कर्मचारीही गौतम यांच्या अधिनस्थ काम करीत आहेत. त्यांच्याचपैकी टिना ठाकूर ही गौतम यांची स्वीय सहायक (पी. ए.) म्हणून कार्य करीत होती. लाच घेतेवेळी आणि लाचेची मागणी करण्यापूर्वी ती ‘साहेबांना पैसे द्यावे लागतील‘ असे म्हणत होती. टिना नेहमीच गौतम यांच्या बाजूला बसून राहायची. मात्र, त्यांनी या घटनेशी संबंध असल्याचा इन्कार केला आहे. त्यामुळे टिनाचे ‘हे साहेब’ कोण, असा प्रश्न प्रशासकीय वर्तुळात चर्चेला आला आहे.
एटीएमसमोर कारवाई
गौतम यांनी दाद दिली नाही. नंतर मंगळवारीही असेच झाले. त्यामुळे आज कारवाई करण्याचे ठरले. आज दुपारी १२ च्या सुमारास लाचेची रक्कम घेऊन सहारे गौतम यांच्या कक्षात पोहचले. त्यांनी गौतम यांना रक्कम देण्याचा प्रयत्न केला. तो लक्षात येताच गौतम यांनी सहारेला रागावून बाहेर काढले. सहारे बाहेर पडताच बाजूला बसलेली टिना उठली. तिने सहारेंना इमारतीच्या पश्चिमेला असलेल्या अॅक्सिस बँकेच्या एटीएम सेंटर समोर नेले. तेथे लाचेचे २५ हजार स्वीकारताच एसीबीच्या पथकाने टिनाला जेरबंद केले. एसीबीचे अधीक्षक वसंत शिरभाते, अतिरिक्त अधीक्षक यशवंत मतकर, संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा येथील उपअधीक्षक अनिल लोखंडे, नायक शिपाई गिरीश कोरडे, नरेंद्र पाराशर, निशिथ रंजन पांडे, मनीष घोडे, प्रदीप कदम, प्रदीप देशमुख, नीलेश बर्वे, रागिणी हिवाळे आदींनी ही कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली.
कर्मचारी-अधिकाऱ्यांत खळबळ
लाच घेताना पकडण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर टिना चांगलीच गोंधळली. ‘साहाब के पास चलो, साहाब के पास चलो‘, असे ओरडू लागली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तिला गौतम यांच्या कक्षात आणले. कार्यालयीन सहायक टिना ठाकूर यांना २५ हजारांची लाच घेताना पकडण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी गौतम यांना सांगितले. त्यांनी या प्रकरणाचा आपल्याशी कवडीचा संबंध नसल्याचे सांगितले. पुढची सर्व कारवाई गौतम यांच्याच कक्षात पार पडली.
गौतम यांच्याकडील कार्यभार काढला
उपायुक्त एस.जी. गौतम यांच्याकडून अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार काढून घेण्यात आला असून तो उपायुक्त (सामान्य प्रशासन) बाळासाहेब धुळाज यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. सध्या गौतम यांच्याकडे उपायुक्त (करमणूक कर) या पदाचा कार्यभार आहे. विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी हा बदल केला आहे. (प्रतिनिधी)