राज्यात थंडीने केले ‘पॅकअप’
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 05:35 AM2020-02-10T05:35:50+5:302020-02-10T05:36:33+5:30
हवामान खात्याची घोषणा : येत्या चार दिवसांत कमाल तापमान वाढणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईसह राज्याला हुडहुडी भरविणाऱ्या थंडीने रविवारी पॅकअप म्हणजेच माघार घेतली आहे. तशी घोषणाच भारतीय हवामान शास्त्र विभागाने केली असून, पुढील चार दिवस राज्यांत कमाल तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. १० आणि ११ फेब्रुवारी रोजी समुद्रकिनारी ३० ते ३२ तर राज्यभरात कमाल तापमान २८ ते ३० अंश नोंदविण्यात येईल. १२ फेब्रुवारी रोजी समुद्रकिनारी कमाल तापमान ३० ते ३२ अंश, तर १३ फेब्रुवारी रोजी कोकणात कमाल तापमान ३२ ते ३४ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागांत किमान तापमानात किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलेनत उल्लेखनीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या उर्वरित भागात किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.
मुंबईची हवा बिघडणार
मुंबईत उबदार दिवस व सुखद रात्रीसह हवामान कोरडे राहील. हवेची गुणवत्ता मध्यम व खराब वर्गात राहण्याची शक्यता आहे. दिवसाचे तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान स्थिरावण्याची शक्यता असून, तर किमान तापमान २० अंशांपेक्षा जास्त राहील.
स्कायमेट काय म्हणते?
चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, सांगली आणि सोलापूर येथे येत्या २४ तासांत हलक्या पावसाची
शक्यता आहे.
मराठवाडा आणि लगतच्या दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या आसपासच्या भागात पुढील २४ तासांत हलक्या सरी आणि गडगडाटी परिस्थिती निर्माण होईल.
विदर्भातील दक्षिणेकडील भागातही पुढील २४ तासांत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, लातूर, बीड, सांगली, सोलापूर इत्यादी ठिकाणी हलका पाऊस होईल.