मेहनत, वेळेचे नियोजन करून फायदेशीर भातशेती

By admin | Published: July 13, 2017 03:33 AM2017-07-13T03:33:25+5:302017-07-13T03:33:25+5:30

भातशेतीच्या पिकापेक्षा मजुरीवर खर्च अधिक होतो.

Paddy cultivation beneficial through hard work, timely planning | मेहनत, वेळेचे नियोजन करून फायदेशीर भातशेती

मेहनत, वेळेचे नियोजन करून फायदेशीर भातशेती

Next

सिकंदर अनवारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दासगाव : भातशेतीच्या पिकापेक्षा मजुरीवर खर्च अधिक होतो. उत्पन्न, खर्च आणि मेहनत याचा ताळमेळ जुळत नाही. अशी अनेक कारणे पुढे करत कोकणातील शेतकरी शेतीपासून दूर जात आहेत. वेळेचे नियोजन आणि अंगमेहनत यांचा ताळमेळ साधला तर शेती फायदेशीर ठरू शकते हे महाड तालुक्यातील गोंडाले गावातील समीर तळेकर या तरुण शेतकऱ्याने सिद्ध केले आहे. गेली पाच ते सात वर्षे समीर आणि त्याचे वडील आपला व्यवसाय सांभाळून उरलेल्या वेळेत तीन खंडी भाताची शेती करीत आहेत.
कोकणामध्ये छोट्या छोट्या तुकड्यामध्ये भात शेती केली जाते. निसर्गाच्या लहरीपणावर ही भात शेती अवलंबून असून, मजुरीचा दर वाढल्याने शेतीमधील फायदा कमी झाला आहे. नांगरणी, लावणी, कापणी आणि झोडणी या चार भात शेतीमधल्या मोठ्या आणि अंगमेहनतीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागत असून गरजेप्रमाणे मजूर मिळत नसल्याने कोकणातील शेतकरी हवालदिल झाला आहे. पारंपरिक पद्धतीप्रमाणे शेती करत असताना शेतीच्या उत्पन्नापेक्षा खर्च अधिक येतो तर कोणतेही अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले तरी शेतीतून मिळणाऱ्या नफ्यात मोठा फरक पडत नाही. त्यातच निसर्गाने फटका दिल्यास हाता-तोंडाशी आलेले भात पीक जमीनदोस्त होण्याची भीती असल्याने शेतकरी भातशेतीपासून दूर चालला आहे. घरामध्ये आई-वडील, मुलगा आणि सून असे चौघांचेच कुटुंब असणाऱ्या समीर तळेकर या तरुण शेतकऱ्याने वेळेचे आणि श्रमाचे नियोजन करून शेती करून दाखवली आहे.
महाड शहरापासून दोन ते तीन किमी अंतरावरती गोंडाळे हे छोटेसे गाव आहे. या गावातील झांझे कोंड येथे समीर तळेकर हा तरुण शेतकरी राहतो. महाडमध्ये खासगी शाळेत स्कूल व्हॅनद्वारे मुलांची वाहतूक करणे, रिक्षा चालविणे हा त्याचा पूर्णवेळ व्यवसाय असून त्याचे वडील सुरेश तळेकर हे गोंडाळे गावचे पोस्टमन आहेत. आपले नियमित काम करून तळेकर पिता-पुत्र फायद्याची शेती करतात.
नांगरणीवरचा खर्च कमी
भात शेती करताना किमान वेगवेगळ्या कामासाठी चार वेळा शेतामध्ये नांगर फिरवला जातो. स्वत:चा नांगर आणि बैलजोडी असली तरी नांगराचा एवढा वापर शेतकऱ्याला परवडणारा नसतो. या अनावश्यक खर्चाचा विचार करून केवळ एकदाच नांगरणी करून तळेकर कुटुंबीय भात शेती करत आहे. सुरुवातीला एकदाच शेतात ट्रॅक्टरद्वारे नांगरणी केली जाते. नंतर चांगल्या पावसाने शेतात अपेक्षित चिखल झाल्यानंतर थेट लावणीचे काम सुरू केले जाते. लावणी करताना पुन्हा शेतात नांगर न फिरवता गरज भासेल तिथे कुदळीने जमीन नरम करत भात शेतीची लावणी केली जाते. पारंपरिक पद्धतीपेक्षाही थोडी वेगळी पद्धत असली तरी यामुळे भात शेतीच्या उत्पन्नात घट होत नसून उलट मेहनत, वेळ, पैसा या तिन्ही गोष्टी वाचल्या आहेत.भात कापणीनंतर मटकीची शेती
भात शेती करत असताना मेहनत आणि वेळेची काटकसर करत ओल्या जमिनीत मटकीचे बियाणे टाकून केवळ खुरपणी आणि झोडणी ही दोनच कामे करून हे कुटुंब मटकीचे पीक देखील चांगल्या प्रकारे घेत आहेत. मटकीला चांगला दर आणि मागणी मिळते तर कमी देखभालीमध्ये पीक चांगले येते. याचा फायदेशीर विचार या ठिकाणी कुटुंबीयांनी केला आहे. वर्षाकाठी ५० किलोपर्यंत मटकीचे उत्पन्न तळेकर कुटुंबीय घेत आहे.शेतीसाठी शेणखताचा वापर
चांगले पीक येण्यासाठी जवळजवळ सर्वच शेतकरी रासायनिक खताचा वापर करतात. शासन सेंद्रिय खतांचा आग्रह करीत असले तरी याबाबत शेतकऱ्यांमध्ये म्हणावी तितकी जनजागृती झालेली नाही. तळेकर कुटुंबीय आपली ही शेती करत असताना रासायनिक खतांऐवजी शेणखताचा वापर करीत शेती करीत आहे. मटकीची शेती झाल्यानंतर उरलेली गुली ज्या शेतकऱ्याला ते देतात त्याच्याकडून पैशाऐवजी शेण तळेकर घेतात आणि या शेणाचा शेतात वापर शेणखत म्हणून केला जातो.
मजुराशिवाय पिता-पुत्राने के ले काम
तळेकर पिता-पुत्राचे काम सकाळी ७.३० वाजल्यापासून सुरू होते, ते तर संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुटी होते. हे पिता-पुत्र संध्याकाळच्या वेळेचे नियोजन करत रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत शेतात मेहनत करतात. तरवा भाजणीपासून ते भात झोडणीपर्यंतची सर्व कामे ते संध्याकाळी ४ ते रात्री ९ या वेळेत करतात. या सर्व कामासाठी एकही विकतचा मजूर ते घेत नाहीत. कामाचे दिवस वाढत असतानाच अंगमेहनत देखील वाचते, मात्र मजुरीवरील खर्च कमी होत असल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत आणि मजुरांच्या नियोजनासाठी त्याच्या मागे फिरतात. वाया जाणारा वेळ ते वाचवतात. मजूर न लावता हे पिता-पुत्र परिश्रम घेत असल्याने मजुरांवर होणाऱ्या मोठ्या खचाची यामुळे बचत होते. तसेच रसायनविरहीत शेती करत असल्यामुळे खत आणि किडनाशकांवरील खर्चाची बचत होती. के वळ शेणखताचा उपयोग के ल्याने जमिनीचे देखिल नुकसान न होता आरोग्यासाठी चांगले अन्नधान्या हे पीता-पुत्र पीकवत आहेत. अनेक खर्चांना फाटा देत असल्याने त्यांची शेती फायद्यात आहे.
>सर्वच शेतकरी मजुरांची कमतरता आणि शेतीतून मिळणारा कमी नफा याची ओरड करतात तर अनेक शेतकरी शेतीच्या कामासाठी महिनाभरासाठी आपल्या कामावर सुट्या टाकतात. या खर्चीकपणातून मार्ग काढण्यासाठी शेती करण्याचा हा मार्ग आम्ही अवलंबला आहे. शेती करत असताना आपली रोजची कामे कुठेही खंडित न करता रिकाम्या वेळेचे नियोजन करून आम्ही शेती करतो हे करत असताना अंगमेहनत होत असली तरी शेतीचे उत्पन्न आणि फायदा वाढत आहे. त्यामुळे अंगमेहनतीचा त्रास होत नाही तर शेती करण्यासाठी जोम अगर प्रोत्साहन मिळते.
- समीर तळेकर, तरुण शेतकरी, गोंडाळे

Web Title: Paddy cultivation beneficial through hard work, timely planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.