संमेलनाच्या मंडपाला पाडगावकरांचे नाव
By admin | Published: January 2, 2016 08:35 AM2016-01-02T08:35:48+5:302016-01-02T08:35:48+5:30
पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य मंडपाला कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे नाव देण्यात येणार आहे. पाडगावकर यांच्या जीवनावर एखादा
पुणे : पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य मंडपाला कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे नाव देण्यात येणार आहे. पाडगावकर यांच्या जीवनावर एखादा कार्यक्रम घेता येतो का, याचाही विचार संयोजक करीत आहेत.
आशयघन कवितांमुळे पाडगावकर यांनी रसिकांच्या हृदयावर अधिराज्य केले. पिंपरी-चिंचवड येथे होत असलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या तोंडावर या सारस्वताने एक्झीट घेतली. या संमेलनात त्यांच्याही सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. आता या संमेलनात मंगेश पाडगावकर यांच्यावर काही कार्यक्रम घेता येईल का, याचा विचार सुरू असल्याचे संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी.डी. पाटील यांनी सांगितले.
संमेलनातील मुख्य मंडपाला पाडगावकर यांचे नाव देण्याचे मात्र निश्चित करण्यात आल्याचे ते म्हणाले. आशा भोसले यांचा संगीत रजनी हा कार्यक्रम संमेलनात होत आहे. यात पाडगावकर यांची गीते समाविष्ट करण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. पाटील म्हणाले.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती वाढावी यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील आणि जिल्हा परिषदेच्या एक हजार शाळांमध्ये संमेलनापूर्वी १२ पुस्तकांचा एक संच भेट देण्यात येणार आहे. मिसाईलमॅन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, सुधा मूर्ती, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, डॉ. सदानंद मोरे, प्राचार्य श्रीपाल सबनीस यांच्या पुस्तकांचा संचामध्ये समावेश असेल.