‘पद्मश्री’ने गौरव केलात, त्याचे ओळखपत्र द्या ना! बीडमधील शब्बीर मामूंची अनोखी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 06:26 AM2022-03-30T06:26:05+5:302022-03-30T06:26:20+5:30
देशातील सर्वोच्च पुरस्कार मिळाला. आता भारत सरकारने या संदर्भातील ओळखपत्र द्यावे, यासह इतर दोन मागण्या शब्बीर मामू यांनी जिल्हा प्रशासनाकडे केल्या आहेत.
- शिरीष शिंदे
बीड : शिरूर तालुक्यातील दहिवंडी येथील शब्बीर सय्यद उपाख्य शब्बीर मामू यांना सलग वीस वर्षे नि:स्वार्थपणे गोसेवा केल्याचे फलित म्हणून मार्च २०१९ मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. देशातील सर्वोच्च पुरस्कार मिळाला. आता भारत सरकारने या संदर्भातील ओळखपत्र द्यावे, यासह इतर दोन मागण्या शब्बीर मामू यांनी जिल्हा प्रशासनाकडे केल्या आहेत.
बीड जिल्ह्यातील शिरुर कासार हा मागास तालुका म्हणून ओळखला जातो. शब्बीर मामू व त्यांचे कुटुंबीय आजघडीला जवळपास १२५ गाई व कालवडी सांभाळत आहेत. आजपर्यंत त्यांनी कोणाचीही मदत न घेता गाईंचा सांभाळ केला आहे. मात्र सध्या उन्हामुळे या भागात पाण्याची टंचाई भासत आहे. दावणीला असणारी जनावरे डोंगरावर नेऊन चार किलोमीटर पायपीट करून सर्व जनावरांना पाणी पाजावे लागत आहे. जनावरांची पाण्याची सोय जागेवर व्हावी, यासाठी कृषी विभागाकडील त्रिसूत्री योजना व गाईंसाठी पिण्याच्या पाण्यासाठी हौद द्यावा, अशी मागणी केलेली आहे. त्यांनी अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांची भेट घेऊन या मागण्या पूर्ण करण्याची विनंती केली आहे.
तीन मागण्यांचे दिले स्मरणपत्र
पद्मश्री पुरस्कारप्राप्त शब्बीर मामू यांनी भारत सरकारचे ओळखपत्र द्यावे, गाईंना पिण्यासाठी पाण्याचा हौद मिळावा व कृषी विभागाकडील त्रिसूत्री योजना मिळावी, यासाठी १२ जून २०१९ रोजी अर्ज केला होता. परंतु, अद्यापही त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नसल्याने त्यांनी पुन्हा जिल्हा प्रशासनाकडे स्मरण करून देणारे पत्र नुकतेच दिले आहे.
प्रत्येक व्यक्तीला त्याचे ओळखपत्र असते. त्याचप्रमाणे भारत सरकारने ओळखपत्र द्यावे. गाईंच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी कृषी विभागाकडील त्रिसूत्री योजना व पाण्याच्या हौद द्यावा, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. त्यावर सकारात्मकपणे निर्णय घेण्यात येईल, असे अपेक्षित आहे.
- शब्बीर सय्यद, पद्मश्री पुरस्कार मानकरी.
पद्मश्री पुरस्कारप्राप्त व्यक्तीला ओळखपत्र देता येते का, याबद्दल शासनाकडे मार्गदर्शन मागविण्यात आले आहे.
- तुषार ठोंबरे, अपर जिल्हाधिकारी, बीड.