पादुका सार्इंच्या, विश्वभ्रमंती विश्वस्त,अधिका-यांची; दौरा थांबविण्यासाठी साईभक्त उपोषण करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 07:49 PM2017-10-26T19:49:31+5:302017-10-26T20:01:08+5:30
प्रमोद आहेर
शिर्डी : देशभर प्रसिद्ध असूनही शिर्डीतील आगमनानंतर साईबाबांनी आपल्या हयातीत कधी पंचक्रोशीच्या सीमा ओलांडल्या नाहीत. त्यांच्या समाधी शताब्दीच्या नावाखाली त्यांच्या पादुकांच्या रूपाने संस्थान त्यांना विश्वभ्रमंतीला घेऊन निघाले आहे.
जगभरातील करोडो भाविकांच्या हृदयात कोणत्याही प्रयत्नांशिवाय जगभरात पोहचलेल्या साईबाबांचा प्रचार ही अफलातून कल्पना आहे. ‘माझा माणूस जगात कोठेही असला तरी चिमणीच्या पायाला दोर बांधून ओढतात तसे मी त्याला शिर्डीला ओढून आणीन’ असे साईबाबा नेहमी म्हणत. त्यांच्या या वचनालाच संस्थानच्या कृतीतूनच हरताळ फासला गेला आहे. विजयादशमीनंतर गोव्यापासून या दौ-याची सुरूवात झाली. राज्याचे सर्व जिल्हे, प्रत्येक राज्याच्या राजधान्या, महत्त्वाची शहरे तसेच पंचवीस देशात या पादुका नेण्यात येणार आहेत. यानिमित्त संस्थानचे पदाधिकारी व अधिका-यांवर देश-विदेशात भ्रमंती करण्याची जबाबदारी येऊन पडली आहे.
जेथे साई अगोदरच पोहचले तेथेच या पादुका जाणार आहेत. ‘माझ्या समाधी नंतर शिर्डीत मुंग्यासारखी गर्दी होईल’ असे बाबा म्हणत. याची नित्य प्रचितीही येते आहे. समाधी शताब्दी वर्षात या गर्दीचा उच्चांक होईल, असे वाटत असतांनाच साईपादुकांची वर्षभर विश्वभ्रमंती सुरू झाली आहे. जगभरातील लोक ज्याच्या दारी दर्शनासाठी तिष्ठत आहेत, त्यालाच आता घरोघरी फिरविले जाणार आहे़ यामुळे ‘भाविक साईदरबारी नव्हे तर साईच आपल्या दारी’ अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शताब्दीत शिर्डीतील गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता मावळली आहे. याशिवाय दौ-यात काही ठिकाणी आयोजक व्यावसायिकदृष्ट्या बघत असल्याची चर्चा आहे. सुरूवातीला दौ-याचे समर्थन करणा-या शिर्डीकरांमध्येही अस्वस्थता पसरत आहे.
बाबांच्या हयातीतील त्यांचे परमभक्त तात्या कोते व बायजाबाई कोते यांचे वंशज सर्जेराव कोते यांनी पादुकांच्या अमेरिका दौ-यावर आक्षेप घेत द्वारकामाई समोर उपोषणाचा इशारा दिला आहे. तर तुकाराम गोंदकर यांनी ग्रामस्थांना पादुका भ्रमंतीबाबत पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे. शताब्दीत अशा निष्फळ प्रचाराची नाही तर शिर्डीत आलेल्या भाविकांचे दर्शन व वास्तव्य आनंददायी कसे होईल याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवाने ते सोडून ‘चमको व घुमकोगिरी’ सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.