पागोटे-चौक ग्रीन कॉरिडॉर बांधणार; मुंबई-बंगळुरु प्रवास सहा तासांत, कोंडी फुटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 07:57 AM2024-11-28T07:57:01+5:302024-11-28T07:58:07+5:30
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६, ४८ आणि ३४८ या तीन महामार्गांसह तो नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू, मुंबई-गोवा आणि गोवा-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गालाही जोडणार आहे.
मधुकर ठाकूर
उरण - सुमारे ३५०० कोटी रुपये खर्चून मुंबई-गोवा आणि मुंबई- बंगळुरु राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा २९ किमीचा जेएनपीए-पागोटे-चिरनेर ते चौक दरम्यान सहापदरी ग्रीन कॉरिडॉर बांधण्यात येणार आहे. येत्या तीन वर्षांत त्याचे काम पूर्ण करण्यात येणार असून रस्त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. तसेच मुंबई-बंगळुरु प्रवास सहा तासांवर येईल, असा दावा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातील सूत्रांनी केला.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६, ४८ आणि ३४८ या तीन महामार्गांसह तो नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू, मुंबई-गोवा आणि गोवा-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गालाही जोडणार आहे. यामुळे मुंबई-बंगळुरू प्रवास सहा तासांत करणे सहज शक्य होईल, असा अंदाज प्राधिकरणाने वर्तविला आहे. उरण-पागोटे ते चौक दरम्यानच्या या मार्गाची लांबी २९.२१९ किमी आहे. या रस्त्यावर चिरनेर आणि आपट्यादरम्यान दोन बोगदेही उभारण्यात येणार आहेत. यात चिरनेर बोगदा १.९ किमीचा, तर आपटा बोगदा १.७ किमीचा आहे. या ट्वीन टनेलची लांबी ३.४७ किमी आहे. या मार्गावर सहा मोठ्या आणि पाच लहान पुलांसह सर्व्हिस रोड, स्लिप रोडचा समावेश आहे.
पागोटे-चौक या प्रस्तावित ग्रीन कॉरिडॉरसाठी तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येत आहे. लवकरच प्रकल्पाच्या कामासाठी निविदा मागविणार येणार आहेत. कार्यादेश दिल्यापासून ३० महिन्यांत हे काम पूर्ण करावे लागणार आहे. या रस्त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. - यशवंत घोटकर, उपसंचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण