पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 19:27 IST2025-04-24T19:24:32+5:302025-04-24T19:27:22+5:30

Pahalgam Terror Attack: दिल्लीतील सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गटाचे नेते उपस्थित नसल्याचे सांगितले जात आहे.

pahalgam terror attack all party meeting in delhi but thackeray group leader absent mp arvind sawant wrote letter to kiren rijiju | पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...

पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...

Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमधील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करून सुमारे २६ पर्यटकांची हत्या केली. दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने अनेक देशांच्या राजदूतांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि घडामोडींची सविस्तर माहिती दिली. भारताने पाकिस्तानवर काही निर्बंध लादल्यानंतर थयथयाट झालेल्या पाकनेही प्रत्युत्तर म्हणून काही निर्णय जाहीर केले. या भ्याड दहशतवादी हल्ल्याबाबत संपूर्ण देशभरातून तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीत सर्वपक्षीय नेत्यांची एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. परंतु, या बैठकीला ठाकरे गटाचे नेते गैरहजर राहिले असल्याची माहिती मिळाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनी संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू ह्यांना पत्र लिहून, संसदीय स्थायी समितीच्या अधिकृत शिष्टमंडळासोबत देशातील विविध भागांत दौऱ्यावर असल्यामुळे सरकारने आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीस वैयक्तिकरित्या उपस्थित राहणे शक्य नसल्याचे कळविले. याबाबत ठाकरे गटाच्या एक्स अकाउंटवरून माहिती देण्यात आली आहे. 

अरविंद सावंत यांनी आपल्या पत्रात नेमके काय म्हटले आहे?

सर्वप्रथम, पहलगाममध्ये झालेल्या भ्याड हल्ल्यात निरपराध नागरिकांना, त्यातही प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्याप्रमाणे हिंदूंना लक्ष्य करण्यात आल्याच्या घटनेप्रती आम्ही सहवेदना व्यक्त करतो आणि ह्या काळात आम्ही भारत सरकार सोबत आहोत हे सांगू इच्छितो. आज सरकारकडून सर्वपक्षीय बैठकीसाठी संसदेतील पक्षनेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, संजय राऊत आणि मी, दोघेही सध्या संसदीय स्थायी समितीच्या अधिकृत शिष्टमंडळासोबत देशाच्या विविध भागांमध्ये आहोत. ही ठिकाणे दुर्गम आहेत, ज्यामुळे वेळेत दिल्लीला पोहोचणे अशक्य आहे आणि केवळ पक्षनेत्यांनाच ह्या बैठकीला उपस्थित राहण्याची परवानगी आहे. त्यामुळे आम्हाला जर दूरसंचाराद्वारे, सुरक्षित व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ह्या चर्चेत सहभागी होता आले, तर आम्ही अत्यंत आभारी राहू.

देशावर झालेल्या ह्या अमानुष आणि भ्याड हल्ल्याला सरकारकडून देण्यात येणाऱ्या कोणत्याही कठोर प्रत्युत्तराला आमचा पूर्ण पाठिंबा असेल, नव्हे तसे द्यायला हवे हे ही स्पष्टपणे नमूद करू इच्छितो. ह्या घटनेबाबत गुप्तचर यंत्रणांची कुचकामी भूमिका, गाफीलपणा, अकार्यक्षमता व हल्ला कसा आणि का झाला, ह्याचाही अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. मात्र आज देशवासीयांनी राजकारण बाजूला ठेऊन एकत्रित पणे सरकारला पाठिंबा देण्याची गरज आहे. जबाबदारी संदर्भातील प्रश्न आज जरी नसले तरी लवकरच देशभक्तीच्या भावनेतून विचारले जातीलच. कारण देशाची सेवा आणि नागरिकांची सुरक्षितता अधिक चांगल्या प्रकारे कशी करता येईल हेच त्यामागे उद्दिष्ट आहे.

आज आपण सर्वजण एकत्र आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की सरकार, संपूर्ण देशाच्या वतीने, दहशतवाद्यांना आणि त्यांच्यामागील शक्तींना असा कठोर धडा शिकवेल की पुन्हा कोणालाही आपल्या नागरिकांकडे वाईट नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही. आपण कृपया सुरक्षित व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आम्हाला ह्या बैठकीत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, ही विनंती, असे खासदार सावंत यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 

 

Web Title: pahalgam terror attack all party meeting in delhi but thackeray group leader absent mp arvind sawant wrote letter to kiren rijiju

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.