पीक विमा भरताना शेतक-यांची दमछाक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 04:38 AM2017-07-29T04:38:54+5:302017-07-29T04:39:01+5:30
मराठवाड्यात पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगामातील पीक विमा भरण्यासाठी शेतकºयांची दमछाक होत आहे. दिवस-दिवस रांगेत उभे राहूनही विमा भरला जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
औरंगाबाद : मराठवाड्यात पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगामातील पीक विमा भरण्यासाठी शेतकºयांची दमछाक होत आहे. दिवस-दिवस रांगेत उभे राहूनही विमा भरला जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी रेटारेटीत दोन महिला शेतकरी बेशद्ध झाल्या.
परभणी जिल्ह्यातील बोरी येथे बस फोडल्याप्रकरणी २४ जणांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. पोलीस लाठीमाराच्या विरोधात येथे बंद पाळण्यात आला, तर बीड जिल्ह्यात काही ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. नांदेड जिल्ह्यातील शंकरनगर (ता़बिलोली) येथील स्टेट बँकेच्या शाखाधिकाºयांनी तहसीलदारांच्या सांगण्यावरून आॅफलाईन पीक विमा भरून घेत असताना गर्दीमुळे झालेल्या रेटारेटीत महानंदा डाकोरे, चंद्रकला डाकोरे या बेशुद्ध झाल्या़ अन्य एका तरुणाला आपला हात गमवावा लागल्याची घटना शुक्रवारी घडली़ त्याचे नाव कळू शकले नाही. बँकेशी संलग्न १८ गावांतील शेकडो शेतकºयांनी तब्बल अडीच तास राज्य महामार्ग रोखून धरल्याने तहसीलदारांच्या शिष्टाईनंतर आॅफलाईन पीक विमा भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत केवळ २ लाख १० हजार शेतकºयांनी पीकविमा भरले.
बोरीत २४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल
परभणीतील जिंतूर तालुक्यातील बोरी येथे विमा काऊंटरची संख्या वाढविण्यालाठी रास्तारोको करून बसच्या काचा फोडल्याप्रकरणी २४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले.गेवराईत रास्ता रोको
बीड जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे ३ वाजेपासून जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी शेतकºयांनी बँकेसमोर रांगा लावल्या. तांत्रिक अडचणींमुळे विमा भरण्याची प्रक्रिया संथगतीने होत असल्याने संतप्त शेतकºयांनी घाटनांदूर आणि गेवराई येथे रास्ता रोको आंदोलन केले.जालना जिल्ह्यात पीकविमा भरण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटरला जोडलेली कृषी विभागाची वेबसाईट व आधार सर्व्हरची गती मंदावल्याने आॅनलाइन पीकविम्याची यंत्रणा पूर्णत: कोलमडली
आहे. सर्वच शाखांमध्ये शेतकºयांचा रांगा पाहायला मिळाल्या.