... ३५ पानांमध्ये लिहून ठेवली सुनेच्या त्रासाची व्यथा
By Admin | Published: July 27, 2016 09:55 PM2016-07-27T21:55:06+5:302016-07-27T21:55:06+5:30
सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्याने आत्महत्या केली असून सुनेसह तिच्या आई, वडिलांकडून होणाऱ्या त्रासाबाबत तब्बल ३५ पानांमध्ये आपली व्यथा मृतकाने लिहून ठेवली आहे.
ऑनलाइन लोकमत
खामगाव, दि. २७ : सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्याने आत्महत्या केली असून सुनेसह तिच्या आई, वडिलांकडून होणाऱ्या त्रासाबाबत तब्बल ३५ पानांमध्ये आपली व्यथा मृतकाने लिहून ठेवली आहे. याप्रकरणात मृतकाच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरुन चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक तायडे कॉलनी भागात रहिवाशी असलेले साहेबराव बळीराम आंबिलडिगे (६२) हे विस्तार अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा लहान मुलगा संदीप आंबिलडिगे याचे २०१५ साली वडाळी ता. नांदुरा येथील पुंडलिक सरदार यांची मुलगी पुनम हिचेशी लग्न झाले. संदीप बुलडाणा येथे आयडीबीआय बँकेत नोकरीला आहे. त्यामुळ मुलगा व सुन बुलडाणा येथे भाड्याने राहत आहे. दरम्यान लग्नानंतर मुलगा व सुनेमध्ये नेहमी खटके उडत होते. याबाबत संदीपने वेळोवेळी वडिलांना माहिती दिली. घरच्यांनी सून पुनम व तिचे आई, वडिल तसेच काकांना होत असलेल्या वादाबाबत माहिती दिली. मात्र त्यांनी समजावून न सांगता उलटपक्षी मुलीला चांगले वागवा अन्यथा तुमच्या विरोधात पोलिसात तक्रारी देवू अशा धमक्या २८ आॅक्टोबर २०१५ रोजी दिल्या.
यानंतरही वेळोवेळी वाद होत असल्याने सुनेला समजावण्याचा प्रयत्न केला असता ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. ५ जुलै २०१६ रोजी पुनमचे वडिल पुंडलिक सरदार, चुलतभाऊ दौलत सरदार यांनी पुन्हा तक्रारी देण्याच्या धमक्या दिल्या. यामुळे साहेबराव आंबिलडिगे यांनी व्यथीत होवून १७ जुलै रोजी आवार येथील शेतामध्ये विष प्राशन केले. त्यांना तात्काळ स्थानिक सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. दहा दिवसानंतर (बुधवारी) त्यांचा मृत्यू झाला.
वडिलांना सून पुनम, तिचे वडिल पुंडलिक सरदार, तिची आई, काका दौलत सरदार यांनी सतत मानसिक छळ करुन व धमक्या देवून आत्महत्येस प्रवृत्त केले अशी तक्रार मृतक यांचा मोठा मुलगा प्रदीप आंबिलडिगे यांनी ग्रामीण पोलिस स्टेश्नला दिली. या तक्रारीवरुन ग्रामीण पोलिसांनी उपरोक्त चारही आरोपीविरुध्द कलम ३०६, ५०६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ग्रामीणचे पोलिस निरीक्षक सचिंद्र शिंदे करीत आहेत.
पोलिस तक्रारीनंतर अंत्यसंस्कार
साहेबराव आंबिलडिगे यांचा बुधवारी मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांवर आभाळ कोसळले. कोणत्याही परिस्थितीत वडिलांना त्रास दिलेल्या व्यक्तींवर कारवाई व्हायला पाहिजे. ही भूमिका आंबिलडिगे कुटुंबाने घेतली. पोलिसांनी या प्रकरणात तक्रार दाखल करायला सुरुवात केल्यानंतरच साहेबराव आंबिलडिगे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.