तिच्या जाण्याच्या दु:खातही वडिलांनी दिली जगाला नवी दृष्टी!

By admin | Published: December 13, 2015 09:09 PM2015-12-13T21:09:52+5:302015-12-13T21:09:52+5:30

मृत व्यक्तीची संमती घेतली नसली तरी केवळ नातेवाईकांच्या संमतीने नेत्रदान करता येते.

The pain of her going to the father gave the world a new vision! | तिच्या जाण्याच्या दु:खातही वडिलांनी दिली जगाला नवी दृष्टी!

तिच्या जाण्याच्या दु:खातही वडिलांनी दिली जगाला नवी दृष्टी!

Next

चिपळूण : केवळ अठराव्या वर्षीच त्यांची मुलगी निपचित पडलेली...आपल्या लाडक्या लेकीचा अवचित झालेला मृत्यू सहन न करू शकणाऱ्या तिच्या वडिलांना अचानक नजरेसमोर अंधपणामुळे काळवंडलेलं आयुष्य घेऊन जगणारी बालकं आठवली आणि त्यांनी लागलीच आरोग्य विभागाशी संपर्क साधला. आभाळाएवढं दु:खं असतानाही त्यांनी आपल्या लाडक्या लेकीचे नेत्रदान करून एक वेगळा आदर्श जगासमोर ठेवला.वालोटी - सुतारवाडी येथील भाग्यश्री भरत सुतार यांचे राहत्या घरी ऐन तारुण्यात १८व्या वर्षी निधन झाले. त्यांचे वडील भरत बाळाराम सुतार यांनी स्वत:चे दु:ख बाजूला ठेवून सामाजिक जाणीव जपत मुलीचे नेत्रदान करुन एक आदर्श घडवला आहे. सकाळी सहा वाजता मुलीच्या मृत्यूनंतर लगेचच कळकवणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्यसेवक प्रफुल्ल विलास केळस्कर यांना कळवले. सह्याद्री निसर्गमित्रचे उदय पंडित, डॉ. ग. ल. जोशी, प्रफुल्ल विलास केळसकर यांनी त्यांच्या घरी जाऊन भाग्यश्री भरत सुतार यांचे नेत्र (कॉर्निया) पंधरा ते वीस मिनिटात काढून सह्याद्री निसर्गमित्रच्याकार्यकर्त्यांच्या हाती सुपूर्द केले. सह्याद्रीच्या कार्यकर्त्यांनी या कॉर्निया पाठवण्याच्या खास एम. के. मीडियम या औषधातून व विशेष बनवलेल्या अतिथंड बॉक्समधून त्वरित सांगली येथील दृष्टीदान आय बँक, डॉ. मिलिंद किल्लेदार यांच्याकडे पाठवले.कळकवणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्यसेवक डॉ. प्रफुल्ल विलास केळस्कर यांनी आरोग्य केंद्राच्या आजुबाजूच्या गावांमध्ये नेत्रदान जागृती चालू केली आहे. या जागृतीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना नेत्रदानाचे महत्व पटत आहे. नेत्रदान म्हणजे मृत्यूनंतर माणसाच्या डोळ्यामधील काळ्या बुबुळाची वरची १/२ मिलिमीटर जाडीची चकती (कॉर्निया) काढून ती अंध व्यक्तीला बसवणे. नेत्रदानात संपूर्ण डोळा काढला जात नाही. हे मृत्यूनंतर ६ तासात करणे आवश्यक असते. मृत व्यक्तीची संमती घेतली नसली तरी केवळ नातेवाईकांच्या संमतीने नेत्रदान करता येते. (प्रतिनिधी)
जिल्हा आरोग्य विभाग, रत्नागिरी, सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळूण, डॉ. ग. ल. जोशी व इतर सर्व नेत्रतज्ज्ञ यांनी चालू केलेल्या नेत्रदान चळवळीला चालना मिळत आहे. गेल्या दहा महिन्यात नऊ नेत्रदान झाली असून, अठरा अंध व्यक्तींना दृष्टी प्राप्त झाली आहे.

Web Title: The pain of her going to the father gave the world a new vision!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.