चित्रकार हा समाजाचा दुवा
By Admin | Published: February 24, 2016 02:07 AM2016-02-24T02:07:17+5:302016-02-24T02:07:17+5:30
कला आणि कलाकारांना जोडणाऱ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून देशाचे चरित्र घडत असते. त्यामुळे चित्रकार हा समाजाचा दुवा असतो, असे प्रतिपादन ‘लोकमत’ मीडिया प्रा. लिमिटेडचे चेअरमन,
मुंबई : कला आणि कलाकारांना जोडणाऱ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून देशाचे चरित्र घडत असते. त्यामुळे चित्रकार हा समाजाचा दुवा असतो, असे प्रतिपादन ‘लोकमत’ मीडिया प्रा. लिमिटेडचे चेअरमन, खासदार विजय दर्डा यांनी केले. मंगळवारी जहांगिर कलादालन येथे ‘द बॉम्बे आर्ट सोसायटी’च्या १२४ व्या वार्षिक कलाप्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ पार पडला. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी आपले वडील स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांची आठवण सांगताना खासदार दर्डा म्हणाले की, स्वातंत्र्य संग्रामातील चित्रकारांच्या अमूल्य योगदानाची जाणीव माझे वडील मला कायम करून द्यायचे. त्याचप्रमाणे ‘श्लोक’ आणि ‘जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी’ या व्यासपीठांच्या माध्यमातूनही अनेक गावागावांतील चित्रकारांसाठी आम्ही व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत. ‘नॅशनल गॅलरी आॅफ मॉडर्न आर्ट’ आणि ‘श्लोक’च्या संयुक्त विद्यमाने ‘रिथिंकिंग द रिजनल’ हा कलात्मकदृष्ट्या अत्यंत परिपूर्ण उपक्रम पार पडल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी ‘श्लोक’च्या शीतल ऋषी दर्डा यांचीही उपस्थिती होती.
‘द बॉम्बे आर्ट सोसायटी’च्या १२४ व्या वार्षिक कलाप्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात ज्येष्ठ चित्रकार प्रा. प्रभाकर कोलते यांचा खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते ‘रूपधर २०१६’ या जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. शाल, एक लाख रुपयांचा धनादेश, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सत्काराला उत्तर देताना कोलते म्हणाले की, ज्यांचे बोट धरून कलेचे शिक्षण घेतले त्यांच्यासमोर भव्य समारंभात सन्मान होणे हे माझ्यासाठी स्वप्नवत आहे. मी नेहमीच कुटुंब, आई-बाबा यांची जबाबदारी टाळली. मात्र माझ्या कलेची जबाबदारी कधीच झटकली नाही. शिक्षकांची शिकवण, त्यांचे ओरडणे या सगळ्यामुळेच हा टप्पा गाठण्यात यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी कोलते यांनी सन्मान स्वीकारताच उपस्थितांमध्ये बसलेले त्यांचे शिक्षक जयंत दातार यांना चरणस्पर्श करून कृतज्ञतेची भावना कोलते यांनी व्यक्त केली. याप्रसंगी खा. दर्डा यांच्या हस्ते प्रदर्शनाच्या कॅटलॉगचा प्रकाशन सोहळाही पार पडला. या वेळी मंचावर संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत, सचिव चंद्रजित यादव उपस्थित होते.
याप्रसंगी ‘द बॉम्बे आर्ट सोसायटी’च्या १२७ वर्षांच्या प्रवासावर बनविण्यात आलेल्या कॅटलॉगच्या सृजनशील निर्मितीबद्दल ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुळकर यांचा गौरव करण्यात आला. शिवाय, या समारंभात सिद्धार्थ अर्जुनवाडे आणि मनोहर गांगण या दोन ज्येष्ठ दिवंगत कलाकारांना ‘कृतज्ञता सन्मानाने’ गौरविण्यात आले. याप्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांतील अनुक्रमे प्रीती अर्जुनवाडे आणि माधवी गांगण यांनी हे पुरस्कार स्वीकारले. या समारंभात नुकत्याच उद्घाटन झालेल्या ‘द बॉम्बे आर्ट सोसायटी’च्या स्वतंत्र इमारतींमधील कलादालनाच्या परिपूर्णतेसाठी महत्त्वाची भूमिका बजावलेल्या रत्नदीप आडिवरेकर आणि नीलेश इंगळे या कलाकारांनाही सन्मानित करण्यात आले.
या समारंभात एकूण ५ लाख ६० हजार रुपयांची पारितोषिके प्रदान करण्यात आली. यंदाच्या वार्षिक कलाप्रदर्शनासाठी देशभरातून विद्यार्थी आणि व्यावसायिक अशा दोन्ही विभागांसाठी एकूण २ हजार १०० प्रवेशिका दाखल झाल्या होत्या, त्यातील २७५ कलाकृतींची निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेसाठी परीक्षकाची भूमिका बजाविलेल्या ज्येष्ठ कलाकार दीपक सोनार यांनाही सन्मानित करण्यात आले. (प्रतिनिधी)
२९ फेब्रुवारीपर्यंत प्रदर्शन खुले
‘द बॉम्बे आर्ट सोसायटी’चे १२४ वे वार्षिक कलाप्रदर्शन हे येत्या २९ फेब्रुवारीपर्यंत जहांगिर कलादालनात आयोजित केले आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत कलारसिकांसाठी हे प्रदर्शन विनामूल्य खुले राहील.