रेशीम निर्माण करणा-या दुर्मीळ पतंगांची जोडी आढळली
By Admin | Published: September 13, 2014 03:17 PM2014-09-13T15:17:38+5:302014-09-13T15:17:50+5:30
पश्चिम घाटातल्या तिलारीच्या जंगलामध्ये प्रथमच रेशीम निर्माण करणार्या दुर्मीळ अशा 'अटॅकस अँटलास' प्रजातींच्या पतंगाची जोडी शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागातील संशोधकांना आढळून आली आहे
'अटॅकस अँटलास' पतंग : नर, मादी, कोष आणि अंडी एकाच ठिकाणी आढळले
मुंबई : पश्चिम घाटातल्या तिलारीच्या जंगलामध्ये प्रथमच रेशीम निर्माण करणार्या दुर्मीळ अशा 'अटॅकस अँटलास' प्रजातींच्या पतंगाची जोडी शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागातील संशोधकांना आढळून आली आहे. विशेष म्हणजे दुर्मीळ अशा या प्रजातीचा नर, मादी, कोष आणि अंडी एकाच ठिकाणी मिळून आल्याची माहिती प्रकल्प प्रमुख डॉ. ए.डी. जाधव यांनी दिली.
नवी दिल्ली येथील काऊंन्सिल ऑफ सायन्टिफिक अँन्ड इंडस्ट्रीयल रिसर्च या भारतातील संशोधन आणि विकासाच्या क्षेत्रासाठी निधी देणार्या संस्थेने जाधव यांच्यासह डॉ. टी.व्ही. साठे आणि डॉ. के.आर. किरवले यांना पश्चिम महाराष्ट्रातील टसर रेशीम संशोधन प्रकल्पासाठी १९.४६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. टसर एरी आणि मुगा या रेशीम प्रकारांची भारत सरकारने जगभर वन्य रेशीम म्हणून ओळख मिळवून दिली आहे.
पश्चिम घाटात विशेषत: महाराष्ट्रातील जिल्ह्यात वन्य रेशीम उत्पादनासाठी नैसर्गिक वने उपलब्ध आहेत. त्याचबरोबर अनेक दुर्मीळ आणि नैसर्गिक वन्य रेशीम उत्पादन देणार्या कीटकांच्या प्रजातीही उपलब्ध आहेत. आजरा, चंदगड आणि तिलारी परिसरातील जंगलात अशा दुर्मीळ पतंग आणि रेशीम उत्पादन देणार्या कीटकांच्या प्रजातींचा शोध घेऊन त्यांचा प्रत्यक्ष रेशीम उत्पादनासाठी उपयोग करण्याच्या दृष्टिकोनातून प्रकल्पप्रमुख डॉ. जाधव आणि त्यांचे सहकारी ओमकार यादव हे तिलारीच्या जंगलात गेले असताना त्यांना 'अटॅकस अँटलास' पतंगांची ही चित्ताकर्षक जोडी, पानांत बांधलेला कोष आणि पानांवर घातलेल्या अंड्यांसह आढळली.
असे असते जीवनचक्र
मादी आकाराने मोठी असते. तिचे पंख रुंद असतात. पण अँटेना छोटा असतो. नराचा आकार व पंख छोटे असतात. मात्र अँटेना नजरेत भरण्याइतका मोठा असतो. नर-मादीचे मीलन नैसर्गिकरीत्या तीन तासांचे असते. प्रयोगशाळेत त्यांचे मीलन घडवणे अवघड असते. मादी फिरोमोन्स नावाचा विशिष्ट द्रव सोडते. त्याचा गंध निसर्गात २५ किलोमीटरपर्यंत पसरतो. त्या गंधामुळे नर तितक्या अंतरावरूनही आकर्षित होऊन मादीचा शोध घेतो. त्यांच्या मिलनानंतर मादी फलित अंडी विशिष्ट झाडांवर पानांच्या खाली टप्प्याटप्प्याने घालते. अळ्यांची वाढ निसर्गातच पूर्ण होते; आणि पुन्हा अंडी-अळी-कोष-पतंग असे जीवनचक्र पूर्ण होते. अटॅकस अँटलास हा लेपीडोपटेरा या कीटक समूहातील सर्वात मोठा पतंग आहे. त्यांच्या पंखांची रुंदी २५ सेंटीमीटरपर्यंत असते. मादी एका वेळी १५0 ते २00 अंडी घालते. त्यातून १0 ते १४ दिवसांत अळ्या बाहेर येतात. अळ्या आंबा, एरंड, सीताफळ, तमालपत्र, पेरू, लिंगडी आदी प्रकारच्या झाडांवर वाढू शकतात. पूर्ण वाढ झालेले कीटक झाडांच्या पानांमध्येच कोष बांधतात. यापासून रेशीम मिळू शकते. हे रेशीम अंत्यत टिकाऊ, तपकिरी रंगाचे आणि लोकरीसारख्या धाग्यांमध्ये मिळते. या प्रजातीचे नर, मादी, कोष पश्चिम घाटात प्रथमच मिळाले आहेत.
(प्रतिनिधी)