कुऱ्ह्यात पाकिस्तान जिंदाबादचे नारे !
By admin | Published: October 10, 2016 04:12 PM2016-10-10T16:12:59+5:302016-10-10T16:12:59+5:30
तिवसा तालुक्यातील कुऱ्हा येथे रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास मोठ्या देवी परिसरातून मोहर्रमचा जुलूस जात असताना काहींनी ‘पाकिस्तान जिंदाबाद
ऑनलाइन लोकमत
अमरावती, दि.10 - तिवसा तालुक्यातील कुऱ्हा येथे रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास मोठ्या देवी परिसरातून मोहर्रमचा जुलूस जात असताना काहींनी ‘पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान मुर्दाबादचे’ नारे दिले. यामुळे संतप्त तरूणांनी कुऱ्हा ठाण्यात धाव घेतली. आरोपींना अटक करण्याऐवजी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी आले असता त्यांनी जमावावर लाठीचार्ज करण्याचे आदेश दिलेत. यामुळे संतप्त जमावाने कुऱ्हा पोलीस ठाण्यावर दगडफेक केली व एसडीओंचे वाहन जाळण्याचा प्रयत्न केला. तसेच आवारातील अन्य वाहनांच्या काचा फोडल्या.
कुऱ्हा येथे मोठ्या देवी संस्थानमध्ये रविवारी सायंकाळी अष्टमीनिमित्त होमहवन व भजनाचा कार्यक्रम होता. रात्री ८ वाजताच्या सुमारास या परिसरातून मोहर्रमची मिरवणूक जात असताना मिरवणुकीतील काहींनी ‘पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान मुर्दाबाद’चे नारे दिल्याचा आरोप मोठ्या देवी परिसरात उपस्थित नागरिकांनी केला. जुलूस पुढे सरकताच या युवकांनी कुऱ्हा ठाणे गाठले व ठाणेदार कांबळे यांना घटनेची माहिती दिली. ठाणेदारांनी या युवकांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, देशविरोधी नारेबाजी करणाऱ्यांना पोलीस अटक करीत नाहीत, अशी भावना निर्माण होऊन जामावातील काही तरूणांनी ठाणेदारांच्या निवासस्थानावर व कक्षावर दगडफेक केली. दरम्यान तेथे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीनिवास घाडगे आले व त्यांना जमावावर लाठीचार्ज करण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे संतप्त जमावाने एसडीपीओंचे वाहन जाळण्याचा प्रयत्न केला व ठाण्याच्या आवारातील काही वाहनांच्या काचा फोडल्या.
काही वेळात दंगाविरोधी पथक व तिवसा आणि मंगरूळ येथील पोलीसांची कुमक आली व जमाव पांगला. दरम्यान युवकांच्या तक्रारीवरून मोहर्रम कमेटीच्या ५ सदस्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली. कुऱ्हा पोलिसांच्या तक्रारीवरून १५ हिंदू तरूणांविरूद्ध कुऱ्हा पोलिसांनी भादंवीच्या कलम ३५३, ३३२, १४३, १४८, १४७ अन्वये तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कलम ३ व ४ तसेच क्रिमिनल लॉ अमेनमेंट ७ अन्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. कुऱ्हा येथे तणावपूर्ण शांतता आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी गावात ठाण मांडून आहेत.