पाकिस्तानला पूर्णपणे ठेचूनच थांबायला हवे - उद्धव ठाकरे
By admin | Published: September 30, 2016 07:52 AM2016-09-30T07:52:30+5:302016-09-30T07:52:30+5:30
सापाला अर्धवट मारू नये व विंचवाची फक्त नांगी मोडू नये. त्यांना संपूर्ण खतम केले नाही तर ते डंख मारीतच राहतील असं उद्धव ठाकरे बोलले आहेत
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 - पाकिस्तानला त्यांच्याच भूमीवर जाऊन धक्का देण्याचे काम ज्या हिंदुस्थानी लष्कराने केले त्याला मानवंदना देण्याचे काम देशाने आता करायचे आहे. या धडक कारवाईसाठी लष्कराला पूर्ण मोकळीक दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आम्ही अभिनंदन करीत आहेत. लष्कराला स्वातंत्र्य दिले तर ते पाकड्यांना त्यांच्याच भूमीत खडे चारतील व लाहोर, कराची, इस्लामाबादवर तिरंगा फडकवतील असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सामना संपादकीयच्या माध्यमातून बोलले आहेत.
बर्याच काळानंतर पाकिस्तानच्या छाताडावर बंदूक रोखून ही चढाई केली आहे. हिंदुस्थानच्या लष्कराला चढाईचा आदेश हवा होता तो मिळवला व निधड्या छातीचे जवान पाकिस्तानात घुसले. हे मर्दानी काम या आधीच घडायला हवे होते. पण सरकारने इतक्यावरच थांबता कामा नये. पाकिस्तानला पूर्णपणे ठेचूनच आता थांबायला हवे. सापाला अर्धवट मारू नये व विंचवाची फक्त नांगी मोडू नये. त्यांना संपूर्ण खतम केले नाही तर ते डंख मारीतच राहतील असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
उरी हल्ल्यानंतर पाकिस्तान ज्या मस्तवालपणे वागत होता व आपले कोण काय वाकडे करणार अशा थाटात शेपटांचे फटकारे आपटीत होता, ते शेपूटच आपल्या धडक लष्करी कारवाईने उखडून टाकले आहे. आज शेपूट मारले, आता डोके ठेचण्याची वेळ आली आहे. पाकिस्तानला योग्यवेळी उत्तर देण्याचे आव्हान लष्कराने दिले होते. पाकिस्तान म्हणजे जगाच्या नकाशावरील एक सडका मेंदू व नासका आंबा आहे. जागतिक दहशतवादाचा तो अखंड चालणारा कारखाना आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.
पाकिस्तान धर्मांध अतिरेक्यांचा जागतिक अड्डा बनला व लष्करशहांच्या मनमानी कारभाराचे बाहुले झाला. त्यामुळे हिंदुस्थानच्या प्रगतीच्या पोटदुखीने त्यांना जे जुलाब सुरू झाले ते गेल्या साठ वर्षांत थांबले नाहीत. तीन युद्धे हरल्यानंतरही त्यांची खुमखुमी जिरली नाही व आताही हिंदुस्थानी फौजांनी त्यांच्या हद्दीत जाऊन आक्रमण केले तरी डोळ्यांवर कातडे ओढून ‘छे, छे, असे काही घडलेच नाही’, असे खोटारडे खुलासे पाकडे करत आहेत.पाकिस्तानचा हा माजोरपणाया आधीच मोडून काढायला हवा होता असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
हिंदुस्थानच्या लष्कराने उचललेले हे पाऊल आता पाकड्यांच्या छाताडावरच पडायला हवे. आता माघार नाही, पुन्हा पाकड्यांशी चहापान नाही. यापुढे त्यांच्याशी क्रिकेट नाही आणि संगीताचे जलसे नाहीत. हिंदुस्थानचा हल्ला पाकिस्तान आज नाकारत आहे. पण या हल्ल्यानंतर पाकिस्तान स्वस्थ बसण्याची शक्यता नाही याचे भान राज्यकर्त्यांबरोबर देशाच्या जनतेनेही राखायला हवे. सीमेवरील राज्यांना या सर्व घडामोडीचा सर्वात जास्त फटका बसतो. सर्वच राजकीय पक्षांनी मतभेदांना तिलांजली देऊन हिंदुस्थानी लष्कराचे मनोबल वाढवायला हवे व सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहायला हवे असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे.