सरसंघचालकांनी वर्तविली पाकच्या फाळणीची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2018 10:53 PM2018-03-19T22:53:46+5:302018-03-19T23:49:57+5:30
आपल्या हक्काचा सिंध प्रांत पाकिस्तानमध्ये गेल्याचे दु:ख सिंधी बांधवांमध्ये कायम असून ते १४ आॅगस्ट रोजी काळा दिवस साजरा करतात. मात्र पुढील २०-३० वर्षात चित्र बदलू शकते. हेच सिंधी बांधव प्रत्यक्ष सिंध भूमीवर उभे राहून गौरव दिवस साजरा करु शकतील, अशी शक्यता सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी वर्तविली.
नागपूर - आपल्या हक्काचा सिंध प्रांत पाकिस्तानमध्ये गेल्याचे दु:ख सिंधी बांधवांमध्ये कायम असून ते १४ आॅगस्ट रोजी काळा दिवस साजरा करतात. मात्र पुढील २०-३० वर्षात चित्र बदलू शकते. हेच सिंधी बांधव प्रत्यक्ष सिंध भूमीवर उभे राहून गौरव दिवस साजरा करु शकतील, अशी शक्यता सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी वर्तविली. अप्रत्यक्षपणे भविष्यात पाकिस्तानची फाळणी होऊ शकते, अशी शक्यता त्यांनी या माध्यमातून बोलून दाखविली. भारतीय सिंधू सभेद्वारे श्री झुलेलाल भगवान यांचा जन्मोत्सव चेट्रीचंड्र साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान सोमवारी ते बोलत होते.
जरीपटका येथील दयानंद पार्क येथे आयोजित या कार्यक्रमाला भारतीय सिंधू सभा अध्यक्ष घनश्यामदास कुकरेजा,मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेन्द्र कुकरेजा, अशोक केवलरामानी प्रामुख्याने उपस्थित होते. सिंधी बांधवांना शरणार्थी म्हणून संबोधले जाते. मात्र ते शरणार्थी नाहीत. संपूर्ण देश त्यांचेदेखील घर आहे. आपल्या राष्ट्रगीतातदेखील ‘सिंध’ शब्द आहे. १४ आॅगस्टच्या वेदना त्यांच्या मनात कायम आहेत. मात्र त्यांचा पुरुषार्थ व परमार्थ यांच्या बळावर आपल्या हक्काच्या सिंध प्रांतात उभे राहून १४ आॅगस्ट हा दिवस ते गौरवदिवस साजरे करु शकतील, अशी शक्यता डॉ.भागवत यांनी वर्तवली. आपल्या देशात सिंधू-सरस्वती संस्कृती आजही टिकून आहे. सिंधी भाषा मजबूत झाली तर भारताच्या इतर भाषादेखील मजबूत होतील. या भाषेची सुरक्षा म्हणजे देशाच्या संस्कृतीची सुरक्षा आहे. सिंधी समाजाचे योग्य संवर्धन झाले पाहिजे. यासाठी भाषा, वेषभूषा, भवन, भजन, भ्रमण आणि भोजन यांची परंपरा कायम राखली पाहिजे, असेदेखील ते म्हणाले. घनश्यामदास कुकरेजा यांनी प्रास्ताविक केले. संगीता सचदेव यांनी संचलन केले.
कुटुंबामध्ये मातृभाषेतूनच संवाद साधावा
आजच्या काळात मातृभाषेची चिंता करण्याची वेळ आली आहे. जर आपली मातृभाषा टिकली तर इतर भाषादेखील टिकतील. त्यामुळे कुटुंबामध्ये संवाद साधताना मातृभाषेचाच वापर झाला पाहिजे, असे प्रतिपादन यावेळी सरसंघचालकांनी केले.