पाकिस्तानी कलाकारांनो, ४८ तासांत भारत सोडा, नाहीतर... - मनसे

By admin | Published: September 23, 2016 10:14 AM2016-09-23T10:14:54+5:302016-09-23T11:17:52+5:30

४८ तासांत भारत सोडून पाकिस्तानात परत गेला नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने पळवू असा इशारा मनसेने पाक कलाकारांना दिला आहे.

Pakistani artists leave India in 48 hours, otherwise ... - MNS | पाकिस्तानी कलाकारांनो, ४८ तासांत भारत सोडा, नाहीतर... - मनसे

पाकिस्तानी कलाकारांनो, ४८ तासांत भारत सोडा, नाहीतर... - मनसे

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ -  जम्मू-काश्मीरमधील उरी येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारताचे १९ जवान शहीद झाल्यानंतर संपूर्ण देशभरात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी पाकिस्तानविरोधातील भूमिका अधिक आक्रमक केली आहे. पाकिस्तानी कलाकार,खेळाडू, गायक भारतात येऊन पैसे कमावतात आणि त्यांचाच देश आपल्यावर हल्ले करून जवानांचे जीव घेतात या मुद्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व सरकारवर तोफ डागलेली असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंनीही या मुद्याला हात घातला आहे. ' येत्या ४८ तासांत भारत सोडून पाकिस्तानात परत जा, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने हुसकावून लावू' असा इशारा मनसेतर्फे पाकिस्तानी कलाकारांना देण्यात आला आहे. 
 
मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी पाकिस्तानी कलाकारांना आपल्या पद्धतीने हुसकावून लावण्याचा इशारा दिला आहे.
  
दरम्यान उरी येथील दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असतानाच रायगडमधील उरण येथे काल चार सशस्त्र व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना आढळल्यानंतर मुंबईसह राज्यभरात खळबळ उडाली असून सर्वत्र हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. उरणमध्ये सकाळी शाळेत निघालेल्या यूईएस शाळेच्या एका विद्यार्थिनीला बोरीनाक्यावर चार संशयित व्यक्ती दिसल्या. पठाणी पेहराव, चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर अत्याधुनिक शस्त्रे आणि पाठीवर बॅग अशा अतिरेक्यांसारख्या पेहरावातील त्या संशयित व्यक्ती घातपाती कारवाया घडवून आणण्याची चर्चा करीत होते, असे या विद्यार्थिनीने सांगितले.
 
(भारतीय लष्करानं प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडून 20 दहशतवाद्यांचा केला खात्मा ?)
(युद्ध सराव करुन पाकिस्तानने पाडला आपलाच शेअर बाजार)
(...तर पाकिस्तान एका दिवसात वठणीवर येईल)
(एफ-१६ लढाऊ विमानांच्या सरावामुळे पाकिस्तानी जनता भयभयीत)

 

पाकिस्तानी कलाकारांना भारतात होणारा विरोध

दरम्यान यापूर्वीही अनेकवेळा पाकिस्तानी कलाकारांना भारतात विरोध सहन करावा लागला आहे. शिवसेना, मनसे यांसारख्या प्रादेशिक पक्षांनी पाकिस्तानी कलाकारांना आपला विरोध नेहमी उघडपणे दर्शवला आहे. शिवसेना तर सत्तेत सहभागी असूनदेखील अनेकदा सरकारविरोधात भूमिका घेत आपलं मत मांडलं आहे.  
नुकतंच काही महिन्यापुर्वी पाकिस्तानी गायक गुलाम अली यांना विरोध करण्यात आला होता. मात्र अशाप्रकारे विरोध करण्यात आलेले गुलाम अली पहिले कलाकार नाहीत. पाकिस्तानी अभिनेत्री माहिराचा चित्रपट 'बिन रोए' याला महाराष्ट्रातील चित्रपटगृहात प्रदर्शितदेखील होऊ दिलं गेलं नव्हतं.  
माहिरा शाहरुख खानचा चित्रपट रईसमध्येदेखील झळकणार आहे. याआधी पाकिस्तानातूनआलेला कॉमेडियन शकीलला देखील परत जावे लागले होते. शकीलला तर चित्रीकरणादरम्यानच तीव्र विरोधामुळे सेट सोडावा लागला आणि मुंबईदेखील. कॉमेडी शोमध्ये शकीलशिवाय रऊफ लाला आणि अनेक दुसरे पाकिस्तानी कलाकार आले, मात्र विरोधामुळे त्यांनाही परत जावे लागले. पाकिस्तान येथून आलेली व बिग बॉस अतिथी बनलेली विना मलिक हिलाही भारतातून परतावे लागले, तर मीरालादेखील अशाच विरोधाचा सामना करावा लागला. मीराला महेश भट्ट यांनी हिंदी चित्रपटात आणले होते. तिच्यासोबत नजर चित्रपट बनविल्यानंतर भट्ट तिला पुन्हा घेऊ इच्छित होते मात्र, विरोधामुळे महेश भट्ट यांना आपला विचार बदलवावा लागला. 
 आपल्या कव्वालीसाठी जगभरात नाव कमविलेले नुसरत फतह अली खान यांचे पुत्र राहत अली खान यांच्या गायनास भारताच्या संगीतप्रेमींनी खूप पसंत केले, मात्र येथे होणार्‍या विरोधामुळे त्यांचे येणेही जवळजवळ बंद झाले आहे. राहत फतेह अली खान सध्या दुबईत जाऊन बॉलिवूडच्या चित्रपटांसाठी गाण्यांचे रेकॉर्डिंग करीत असतात. पाकिस्तानचे आणखी एक गायक आतिफ असलम यांनादेखील विरोधामुळे भारतात येण्याचा विचार बदलावा लागला. 
अली जाफर सलग बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये काम करीत आहे आणि त्याच्या कोणत्याही चित्रपटाच्या प्रदर्शनाला काहीही अडचण आली नाही. खूबसूरत चित्रपटात सोनम कपूरचा नायक बनलेल्या फवाद खानला देखील अशा समस्येचा सामना करावा लागलेला नाही. तो अजूनही बॉलिवूडच्या तीन चित्रपटांमध्ये काम करीत आहे.आणखी एक पाकिस्तानी कलाकार इमरान अब्बास विक्रम भट्टचा चित्रपट क्रिचरमध्ये दिसला होता. सध्या तो करण जोहरचा नवीन चित्रपट ए दिल है मुश्किल मध्ये काम करीत आहे. 
नुकताच सलमान खानचा चित्रपट बजरंगी भाईजानमध्ये 'भर दे झोली' गाणारे अदनान सामी अनेक वर्षांपासून मुंबईत राहत आहेत आणि त्यांना कोणतीच अडचण आली नाही. गझल गायक गुलाम अली यांचा मुंबई येथे होणारा गझल गायनाचा कार्यक्रम शिवसेनेच्या विरोधामुळे अखेर रद्द झाला. परंतु असे पहिल्यांदाच झालेले नाही. गुलाम अली यांचा हा चौथा कार्यक्रम आहे, जो शिवसेनाच्या विरोधामुळे रद्द करण्यात आला. पाकिस्तानकडून भारतात दहशतवाद पसरविला जात असल्यामुळे शिवसेना अनेक वर्षांपासून पाकिस्तानी कलाकारांना येथे चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम करण्यास विरोध केला आहे.
 

Web Title: Pakistani artists leave India in 48 hours, otherwise ... - MNS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.