पाकिस्तानातील कॉल वाढले
By Admin | Published: February 27, 2016 02:03 AM2016-02-27T02:03:34+5:302016-02-27T02:03:34+5:30
पाकिस्तान इंटेलिजन्स आॅपरेटीव्हज (पीआयओ) कडून भारतातील लष्कराविषयीची माहिती काढून घेण्यासाठी जवानांना येणाऱ्या फोन कॉलमध्ये वाढ झाली आहे. इतकेच नाही तर अधिकाऱ्यांच्या
पुणे : पाकिस्तान इंटेलिजन्स आॅपरेटीव्हज (पीआयओ) कडून भारतातील लष्कराविषयीची माहिती काढून घेण्यासाठी जवानांना येणाऱ्या फोन कॉलमध्ये वाढ झाली आहे. इतकेच नाही तर अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनाही अशापद्धतीचे फोन येत आहेत. त्यामुळे लष्कराशी संबंधित प्रत्येक व्यक्तीने तसेच सामान्य नागरिकांनाही याविषयी काळजी घ्यावी, असे आवाहन पुण्याच्या दक्षिण मुख्यालयाचे लेफ्टनंट जनरल बिपीन रावत यांनी केले आहे.
मी लष्करातील एक अधिकारी बोलतोय, विशिष्ट व्यक्ती आता कुठे आहे, कोणत्या मोहीमेवर काम करत आहे अशा प्रकारची गुप्त माहिती विचारणारे फोन येत आहेत. आपला वरिष्ठ अधिकारी बोलतोय म्हटल्यावर जवानांकडूनही अशी माहिती तत्काळ सांगितली जायची.
मात्र अशा प्रकाची चौकशी करणारे फोन आले तर समोरच्या व्यक्तीला त्याचा फोन नंबर विचारावा आणि आपण पुन्हा कॉल करु, असे सांगावे. समोरुन बोलणाऱ्या व्यक्तीने फोन कट केला तर तो कॉल बनावट असल्याचे सहज लक्षात येते. याबाबत सुरक्षा बाळगण्याच्या विशेष सूचना लष्कराला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यासंबंधी बोलताना रावत म्हणाले, इतके दिवस केवळ जवान किंवा अधिकाऱ्यांना पीआयओकडून येणारे फोन आता अधिकाऱ्यांच्या मुलांनाही यायला लागले आहेत. त्यावरुन वडील कुठे आहेत, कधी येणार अशी विचारणा या मुलांना होत आहे. त्यामुळे सर्वांनी सतर्क राहून त्याचा सामना करण्याची आवश्यकता आहे. अनेकदा नागरिकांनाही पाकिस्तानमधून अशाप्रकारचे फोन येतात. अशावेळी तातडीने जवळच्या पोलिस स्टेशनला तसेच लष्कराशी संबंधित अधिकाऱ्यांना याची माहिती द्यावी, असे रावत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)