पाकिस्तानी महिलेची अकोल्यात परवड!
By Admin | Published: May 3, 2016 02:12 AM2016-05-03T02:12:16+5:302016-05-03T02:12:16+5:30
कराचीत झाला होता विवाह; नव-याने टाकले आणि व्हिसाची मुदतही संपली.
अकोला : मूळची पाकिस्तानातील कराचीची रहिवासी असलेली रुकसाना बानो (५३) ही महिला गेल्या दहा वर्षांपासून भारतात रानोमाळ भटकत आहे. अकोल्यातील मो. रफिक शेखानी याने २00४ साली निकाह करून तिला भारतात आणले; परंतु नंतर तिची जबाबदारी नाकारली. आता कराचीला परत जाण्यासाठी जमा पुंजी नाही आणि व्हिसाची मुदतही संपलेली असल्याने तिची परवड सुरू आहे.
रुकसाना बानो सध्या आकोट फैल पोलिसांच्या ताब्यात आहे. जुनागढ पोलिसांनी तिला अकोल्यात आणून सोडले. २00४ मध्ये अकोल्यातील आकोट फैलात राहणारा मो. रफिक शेखानी कराचीमध्ये टेलिकॉम कं पनीत नोकरीनिमित्त कराचीत गेला होता. तेथे त्याने रुकसानाशी निकाह केला. तीन वर्षे पाकिस्तानात राहिल्यानंतर हे दाम्पत्य मुंबईत आले. तेथे काही वर्षे राहिल्यानंतर ते गुजरातमधील विसादरमध्ये राहू लागले.
दरम्यान, रफिकने तिला दूर सारले. त्यामुळे रुकसानावर बेघर होण्याची वेळ आली. याचदरम्यान तिच्या पाच वर्षांच्या व्हिसाचा कालावधी संपला. त्यामुळे तिला जुनागढ पोलिसांनी अटक केली. दोन महिने तिने कारागृहात काढले. जुनागढ व भावनगर येथील काही नागरिकांची मदत घेत, तिने जामीन मिळविला. त्यानं तर जुनागढ पोलिसांनी तिला अकोल्यात आणून सोडले.
अकोल्यात घरी गेल्यावर तिला कुलूप दिसून आले. पोलिसांनी तिच्या सावत्र मुलाला बोलाविले; परंतु त्याने रुकसानाशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले. त्यामुळे आता तिने पाकिस्तानात परत जाण्यासाठी मनाची तयारी केली आहे. मला कराचीला पोहोचवा, अशी विनंती ती पोलिसांना करीत आहे.
पोलीस म्हणतात, कुटुंबीय स्वीकारण्यास तयार!
पोलिसांनी सांगितले की, रुकसानाचा सावत्र मुलगा बाहेरगावी गेल्याने त्यांच्या घराला कुलूप आहे. मुलाला विचारणा केल्यावर त्याने रुकसानाला सांभाळण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. मात्र तिची पाकिस्तानात जाण्याची इच्छा असेल, तर पोलीस कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तिला पाकिस्तानात पाठवतील.
रुकसानाला राहण्याची परवानगी
सध्या रुकसानाला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून व्हिसाची मुदत वाढवून मिळाली आहे. त्यामुळे ती येथे वर्षभर राहू शकते.