पाकचा तपास हा ‘फार्स’

By admin | Published: February 14, 2016 01:44 AM2016-02-14T01:44:41+5:302016-02-14T01:44:41+5:30

मुंबईवरील हल्ल्यानंतर दहशतवादी संघटनांची आणि दहशतवाद्यांची कसून चौकशी करण्याचा आणि लष्कर-ए-तोयबाच्या (एलईटी) दहशतवाद्यांना ताब्यात घेऊन पाकिस्तानने

Pakistan's investigation into 'fars' | पाकचा तपास हा ‘फार्स’

पाकचा तपास हा ‘फार्स’

Next

मुंबई : मुंबईवरील हल्ल्यानंतर दहशतवादी संघटनांची आणि दहशतवाद्यांची कसून चौकशी करण्याचा आणि लष्कर-ए-तोयबाच्या (एलईटी) दहशतवाद्यांना ताब्यात घेऊन पाकिस्तानने आपणही दहशतवादाविरोधात लढत आहोत, असे जगाला दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र डेव्हिड हेडलीने पाकिस्तानचे पितळ उघडे केले आहे. पाकिस्तानने हा सगळा दिखावा केल्याची धक्कादायक माहिती अमेरिकन नागरिक आणि एलईटीचा दहशतवादी डेव्हिड हेडलीने मुंबईतील विशेष मोक्का न्यायालयाला दिली. पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने एलईटीचा संस्थापक हाफीज सईद आणि मुख्य सूत्रधार झकी-उर-रहमान लख्वी यांना काहीच धोका नाही, अशी माहिती आयएसआयचा माजी मेजर अब्दुल रहमान पाशा याने हेडलीला सांगितल्याची माहिती खुद्द हेडलीने शनिवारी साक्ष नोंदवताना न्या. जी. ए. सानप यांना दिली.
हेडलीने ओळखला साजिद मीर, अबू काफा आणि अबू अल- कामाचा आवाज
मुंबईच्या हल्ल्यावेळी एलईटीचा साजिद मीर आणि अन्य सदस्य कराचीहून दहशतवाद्यांच्या थेट संपर्कात होते, असे हेडलीने मान्य करत त्या वेळी सुरू असलेल्या संभाषणाची सीडी ऐकवली असता हेडलीने साजिद मीर आणि मुंबईवर हल्ला करणारे अबू कामा आणि अबू काफा यांचा आवाज ओळखला.
या संभाषणाद्वारे साजिद मीर या दोघांचेही मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करत होता; तसेच छाबड हाउसला आग लावण्याची सूचना देत होता. (प्रतिनिधी)

हाफीज आणि लख्वीला काहीही होणार नाही - पाशा
‘चाचा (लख्वी) आणि त्याच्या मित्रांबरोबर (हाफीज सईद) जे काही घडणार आहे, तो केवळ एक दिखावा आहे. काहीही काळजी करू नकोस, त्यांना काहीही होणार नाही,’ असा
ई-मेल आयएसआयचा माजी मेजर आणि अल-कायदाचा सदस्य अब्दुल रहमान पाशा याने हेडलीच्या ई-मेलला उत्तर देताना म्हटले. मात्र लख्वी दबावाखाली हेडलीचे नाव घेऊ शकतो, असा इशाराही पाशाने दिला होता.

‘चाचा दबावाखाली येऊन कदाचित इस्माईलचे नाव उघड
करेल,’ असेही ई-मेलमध्ये म्हटले होते. त्यावर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांकेतिक भाषेतील हा ‘चाचा’ कोण अशी विचारणा केल्यावर हेडलीने चाचा लख्वीला म्हणत असल्याचे सांगितले.

२६/११ हल्ल्यानंतर वर्षभरातच मुंबईच्या आसपासच्या शहरांत बॉम्बस्फोट करण्याचा एलईटीचा कट होता. एलईटीचा साजिद मीर भारतावर, विशेषत: महाराष्ट्रात दुसरा हल्ला करण्यासाठी तयार झाला होता. १० जुलै २००९मध्ये साजिद मीरने हेडलीला एक ई-मेल पाठवला. ‘इनव्हेस्टमेंट प्लॅन’ तयार आहे. मात्र राहुलच्या शहरात नाही. जवळपासच्या शहरात,’
असे मीरने ई-मेलमध्ये म्हटले होते.

हेडलीने याचा न्यायालयापुढे खुलासा करताना म्हटले की, हल्ल्याची दुसरी योजना तयार आहे. मात्र ती राहुल भटच्या शहरात म्हणजेच मुंबईत नाही, तर मुंबईच्या आजूबाजूच्या शहरांत हल्ला करण्यात यावा. या मेलनंतर हेडली मीरला भेटलाच नाही. त्यामुळे या हल्ल्यासाठी कोणते शहर आणि ठिकाणे निवडण्यात आली होती, याची माहिती नसल्याचे हेडलीने सांगितले. साक्षीदरम्यान हेडलीने न्यायालयाला हेही सांगितले की, त्याच्या सर्व भारतीय मित्रांची माहिती डॉ. तहव्वूर राणा आणि आयएसआयचा निवृत्त मेजर इक्बाल याला तो सतत देत असे.

2008
मध्ये हल्ला झाल्यानंतर इलियास काश्मिरीने दिलेले काम पूर्ण करण्यासाठी हेडलीला २००९मध्ये पुन्हा भारतात यायचे होते. मात्र २६/११च्या हल्ल्यानंतर भारताची सर्व यंत्रणा सतर्क झाल्याने हेडलीला आपण पकडले जाऊ किंवा मारले जाऊ, अशी भीती वाटत होती. त्यामुळे ७ मार्च रोजी भारतात येण्यापूर्वी हेडलीने त्याचे इच्छापत्र शिकागो येथे असलेल्या डॉ. राणा यांना
मेल करून पाठवले होते.

2009
जुलै मध्ये एफआयएने हल्ल्याची चौकशी करण्यास सुरुवात केली तेव्हा हेडलीने एलईटीचा हॅण्डलर साजिद मीरला ‘अंकल’ (झकी- उर- रहमान लख्वी)ची समस्या जाणण्याकरिता मेल केला. त्यावर उत्तर देताना मीरने हेडलीला सांगितले की, अंकल इज व्हेरी वेल अ‍ॅण्ड ही इज फ्लार्इंग हाय... याचा अर्थ लख्वी एकदम ठीकठाक असून, त्याचे मनोधैर्य उंचावलेले आहे, असा या ई-मेलचा अर्थ असल्याचे हेडलीने न्यायालयाला सांगितले.

मीरने हाफीज सईदलाही अटक होण्याची शक्यता वर्तवली होती. ‘ओल्ड अंकलला एच १ची लागण झाली आहे. डॉक्टरांना त्यांना रुग्णालयात नेऊन तपासणी करायची आहे,’ असे मीरने ई-मेलमध्ये
म्हटले होते. याचा अर्थ
हाफीज सईदचीही चौकशी करण्यात येत आहे आणि त्याला अटक होण्याची शक्यता आहे. मात्र तरीही त्याला काही होणार नाही, असेही आश्वासन मीरने हेडलीला दिले होते.

पुण्याचे एनडीएन होते रडारवर
पुणे, गोवा, दिल्ली, राजस्थान येथील पुष्कर या
ठिकाणी असलेल्या छाबड हाउसची रेकी करण्याचा आदेश इलियास काश्मिरीने हेडलीला दिला होता. त्यानुसार हेडली
७ ते १७ मार्चदरम्यान पुन्हा भारतात आला. आधी तो पुष्कर येथे गेला आणि तेथील छाबड हाउसची बाहेरूनच रेकी
केली. त्यानंतर हेडली पुण्याला गेला. मात्र पुरेसा वेळ नसल्याने तो पुणे फिरू शकला नाही. त्याने केवळ छाबड हाउसचीच रेकी केली. मात्र त्यापूर्वी त्याने साजिद मीरच्या सांगण्यावरून पुण्याच्या नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमीची (एनडीए) रेकी केली होती.

Web Title: Pakistan's investigation into 'fars'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.