पाळा आश्रमशाळा प्रकरणाला शिक्षकाच्या अनैतिक संबंधांची किनार!
By admin | Published: November 9, 2016 05:57 AM2016-11-09T05:57:05+5:302016-11-09T05:57:05+5:30
आपल्या अनैतिक संंबधाचे ‘बिंग’ इत्तुसिंगच्या तोंडून बाहेर पडू नये म्हणून आश्रमशाळेतील एक शिक्षक विद्यार्थिनींनी केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करीत होता
अनिल गवई, खामगाव (जि. बुलडाणा)
आपल्या अनैतिक संंबधाचे ‘बिंग’ इत्तुसिंगच्या तोंडून बाहेर पडू नये म्हणून आश्रमशाळेतील एक शिक्षक विद्यार्थिनींनी केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करीत होता. या शिक्षकाच्या अभयामुळेच इत्तुसिंगचा मुलींवर अत्याचार वाढला होता, अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे.
पाळा येथील आदिवासी आश्रमशाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर संपूर्ण शैक्षणिक वर्तुळ हादरुन गेले आहे. याप्रकरणी दोन विद्यार्थिनींच्या वेगवेगळ्या तक्रारींवरून मुख्य आरोपी इत्तुंसिंग पवार याच्यासह १७ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणाची चौकशी करीत असलेल्या विशेष पथकासमोर या संपूर्ण प्रकरणाला एका शिक्षकाच्या अनैतिक संंबंधाची किनार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पथकाने केलेल्या चौकशीत एका शिक्षकाचे महिलेसोबत असलेल्या अनैतिक संंबंध होते. या शिक्षकाच्या या अनैतिक संबंधाचे ‘बिंग’ इत्तुसिंगला माहीत होते. इत्तुसिंग आपल्याला अडचणीत आणू शकतो, अशी भीती असल्याने सदर शिक्षक विद्यार्थिंनींनी इत्तुसिंगविरुद्ध केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करीत होता. वासनांध इत्तुसिंगचे धाडस यामुळे वाढल्याचे तपासात समोर आले आहे.