निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी! यंदाच्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची भावपूर्ण वातावरणात सांगता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 06:22 PM2020-07-16T18:22:07+5:302020-07-16T18:26:26+5:30
यंदा कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर श्री संत तुकाराम महाराजांचा पायीवारी पालखी सोहळा रद्द झाला होता..
देहूगाव- जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३५ व्या आषाढीवारी पालखी सोहळ्याची मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत फिजिकल डिस्टंस राखत भक्तीमय वातावरणात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सांगता झाली. आषाढी एकादशी असूनही आज मंदिरात मात्र संपुर्णपणे शुकशुकाट होता. मंदिराचे सर्व दरवाजे बंद होते.
यंदा कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर श्री संत तुकाराम महाराजांचा पायीवारी पालखी सोहळा रद्द झाला होता. केवळ ५० लोकांच्या उपस्थितीत श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे प्रस्थान १२ जून रोजी करण्यात आले होते. प्रस्थानानंतर या पादुका येथील भजनी मंडपातच ठेऊन वारीच्या वाटचालीतील नित्य उपक्रम मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत सुरू ठेवले होते. शासनाच्या परवानगीनंतर या पादुका आषाढ दशमीच्या दिवशी शासनाच्या वतीने पुरविण्यात आलेल्या एसटी बसने ३० जून रोजी दुपारी पंढपूरला नेण्यात आल्या होत्या. पंढरपूर येथे एकादशीच्या दिवशी पादुकांना चंद्रभागा स्नान व नगर प्रदक्षिणा झाली. बारशीच्या दिवशी देवभेट घेऊन पादुका २ जुलैला देहूत दाखल झाल्या होत्या. यानंतर येथील भजनी मंडपातच वाटचालीचे कार्यक्रम काही लोकांमध्ये पार पाडले जात होते.
आज आषाढी एकादशीनिमित्त प्रथेनुसार प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने पहाटे चार वाजता काकडा आरती करण्यात आली. पहाटे साडेचार वाजता शिळामंदिराची महापूजा संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे यांच्या हस्ते करण्यात आली. पहाटे पाच वाजता विठ्ठल रुक्मीनी मंदिरात संस्थानचे अध्यक्षांसह पालखी सोहळा प्रमुख विशाल महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, विश्वस्थ संजय महाराज मोरे, अजित महाराज मोरे यांच्या हस्ते विधीवत महापूजा करण्यात आली. पहाटे साडे पाच वाजता वैंकुठगमन मंदिरात विश्वस्थांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. सहा वाजता पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराजांच्या समाधीची संस्थानचे अध्यक्ष व विश्वस्थांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.
सकाळी १० ते १२ वाजेपर्यत भजनी मंडपात भजन करण्यात आले. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पालखी मंदिर प्रदक्षिणेसाठी भजनीमंडपातुन बाहेर काढण्यात आली. मंदिर प्रदक्षिणा दरम्यान, पंचपदी, नित्य अभंग व गौळण व आरती करण्यात आली. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मंदिर प्रदक्षिणा संपवून पालखी पादुकांसह भजनीमंडपात आणण्यात आली. येथे पालखी सोहळा प्रमुख,संस्थानचे अध्यक्ष व विश्वस्थयांच्या हस्ते सेवेकरी यांना मानाचा श्रीफळ प्रसाद देवून सन्मान करण्यात आला. संस्थानच्या वतीने महाप्रसादानंतर पालखी सोहळ्याची सांगता झाली.
फोटो स्वतंत्र पाठविले आहेत.