पालिका ‘कॅम्पा कोला’ला आज बजावणार नोटीस
By admin | Published: June 9, 2014 02:52 AM2014-06-09T02:52:25+5:302014-06-09T02:52:25+5:30
सर्वोच्च न्यायालयाची प्रत अद्याप महापालिका प्रशासनाला मिळाली नसल्याच्या कारणास्तव आता ९ जून (सोमवार) रोजी कॅम्पा कोलातील रहिवाशांना नोटीस बजावण्यात येणार आहे.
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाची प्रत अद्याप महापालिका प्रशासनाला मिळाली नसल्याच्या कारणास्तव आता ९ जून (सोमवार) रोजी कॅम्पा कोलातील रहिवाशांना नोटीस बजावण्यात येणार आहे.
कॅम्पा कोलाच्या रहिवाशांनी पुन्हा दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर त्यांनी येथील सदनिका रिकाम्या केल्या आहेत. तात्पुरता निवारा म्हणून कॅम्पा कोला कम्पाउंडमध्ये तंबू ठोकला आहे. मागील मंगळवारीच कॅम्पा कोलाच्या रहिवाशांना पालिका प्रशासनाच्या वतीने नोटीस बजावण्यात येणार होती. मात्र केवळ सर्वोच्च न्यायालयाची प्रत प्राप्त झाली नसल्याच्या कारणास्तव ही कार्यवाही विलंबाने होत आहे.
पालिकेने बजावलेल्या नोटिसीची मुदत संपल्यानंतर येथील वीज आणि गॅसपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. शिवाय येथील बेकायदा मजले पाडण्यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात येत आहे. त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. पालिकेला अतिरिक्त मनुष्यबळाच्या मदतीने प्रथमत: इथल्या आतील भिंती जमीनदोस्त करता येतील, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी दिली.
कम्पाउंडमध्ये रहिवाशांकडून उभारलेल्या तंबूला पावसाळ्यात तरी किमान अभय द्यावे, अशी मागणी पालिकेच्या जी-नॉर्थच्या सहायक अभियंत्यांकडे केली आहे, अशी माहिती कॅम्पा कोलाच्या प्रवक्त्या नंदिनी मेहता यांनी दिली. (प्रतिनिधी)