पालघर कॉपी प्रकरणात जामीन नाकारला
By admin | Published: April 1, 2016 12:32 AM2016-04-01T00:32:38+5:302016-04-01T00:32:38+5:30
पालघर जिल्हा प्रशासनाने गेल्या १८ आॅक्टोबर रोजी लिपिक-टंकलेखक पदांसाठी घेतलेल्या लेखी परीक्षेत परीक्षार्थींना प्रश्नांची उत्तरे मोबाईलवर एसएमएसने पाठवून कॉपी केली
मुंबई: पालघर जिल्हा प्रशासनाने गेल्या १८ आॅक्टोबर रोजी लिपिक-टंकलेखक पदांसाठी घेतलेल्या लेखी परीक्षेत परीक्षार्थींना प्रश्नांची उत्तरे मोबाईलवर एसएमएसने पाठवून कॉपी केली गेल्या प्रकरणी गजानन रामराव लांडे आणि राजीव ऊर्फ राजू रामराव लांडे या आरोपी पिता-पुत्रांना उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला आहे.
या परीक्षेस विद्यापीठ आणि अन्य परीक्षांमधील गैरप्रकार प्रतिबंधक कायदा लागू होत नसला तरी दंड विधानाखालील अन्य कलमान्वयेही गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यात दोन्ही आरोपींचा सहभाग सकृद्दर्शनी स्पष्ट दिसतो. त्यामुळे पूर्ण पूूर्वतयारीनिशी राबविल्या गेलेल्या या कॉपी रॅकेटचा पूर्णपणे उलगडा होण्यासाठी आरोपींना कोठडीत घेऊन तपास होणे गरजेचे आहे, असे न्या. मृदुला भाटकर यांनी अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळताना नमूद केले.
तारापूर आणि वर्तक हायस्कूल, माणिकपूर-वसई येथील परीक्षाकेंद्रांवर अनुक्रमे संगीता नारायण सुराडकर आणि अरुण शामराव गवळी या दोन परीक्षार्थींना त्यांच्या मोबाईलवर प्रश्नांच्या उत्तराचे एसएमएस आल्यावर रंगोहाथ पकडले गेले होते. एवढेच नव्हे तर गवळी अन्य एका परीक्षार्थीचा ‘डमी’ म्हणून परीक्षा देत होता, असेही आढळले होते. पोलिसांनी एकूण आठजणांविरुद्ध दोन गुन्हे नोंदविले आहेत. (विशेष प्रतिनिधी)
अक्कलहुशारीचे कारस्थान एम्सएमएसने प्रश्नांची उत्तरे
पोलीस तपासात या रॅकेटची जी कार्यपद्धती उघड झाली ती थोडक्यात अशी: लांडे पिता-पुत्रांसह इतरांनी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये फिरून, सरकारी नोकरीसाठी मदत करू शकतो, असे सांगून अनेकांकडून वैयक्तिक ओळख व पत्त्याची कागदपत्रे गोळा केली. या कागदपत्रांवर त्यांनी विविध मोबाईल कंपन्यांची एकूण ४५ सिमकार्ड घेतली.
पालघर जिल्हा परिषदेची ही परीक्षा जाहीर
झाल्यावर त्यांनी इच्छुक परीक्षार्थींकडून प्रत्येकी दोन लाख रुपये घेऊन त्यांना ही सिमकार्ड घातलेले मोबाईल दिले. परीक्षेच्या वेळी त्या मोबाईलवर एसएमएसने प्रश्नांची उत्तरे पाठविली गेली.
ज्या दोन परीक्षार्थींना रंगेहाथ पकडले
गेले त्यांना ‘७२१९०३८६८२‘ आणि ‘९१६८९९९३५४’ या क्रमांकांवरून उत्तरांचे एसएमएस पाठविले गेले होते. संगीता सुराडकर हिचा मोबाईल परीक्षा हॉलमध्ये जप्त करून बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाकडे दिला गेला होता. उत्तरे एसएमएसने पाठविली जात असल्याचे लक्षात आले. गवळीने रबराने बांधून मोबाईल आणला होता.