पालघर जिल्ह्यात सर्वत्र पूरस्थिती, धरणे भरली

By admin | Published: August 3, 2016 02:53 AM2016-08-03T02:53:25+5:302016-08-03T02:53:25+5:30

गेल्या चार दिवसांपााून सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यात पूरसदृश्य स्थिती

In the Palghar district floods everywhere, the dams are filled | पालघर जिल्ह्यात सर्वत्र पूरस्थिती, धरणे भरली

पालघर जिल्ह्यात सर्वत्र पूरस्थिती, धरणे भरली

Next


पालघर/डहाणू/जव्हार/ मोखाडा/वाडा/बोईसर/विक्रमगड : गेल्या चार दिवसांपााून सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यात पूरसदृश्य स्थिती असून पश्चिम रेल्वे कूर्मगतीने सुरू आहे. तर जिल्ह्यातील प्रमुख धरणे भरल्यामुळे त्यातून सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे नद्या, नाले यांना पूर आले आहेत. त्यात पाणलोट क्षेत्राबाहेरील पाण्याची भर पडल्याने महापूराचाही धोका काही ठिकाणी आहे. अजूनही पाऊस थांबत नसल्याने प्रशासनाने सावधगिरीचा इशारा दिलेला आहे. तर काही ठिकाणी अनेकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. मोडकसागर भरून वाहू लागले आहे. तर धामणीचे पाच दरवाजे उघडले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते आणि पूल पाण्याखाली गेल्याने रस्ते वाहतूक आणि एसटी ठप्प झाली आहे. झाडे कोसळणे, इमारत कोसळणे अशा दुर्घटनाही गेल्या २४ तासात घडल्यात परंतु त्यात जीवितहानी झालेली नाही.
वसई: गेल्या तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसाचा जोर आजही कायम होता. त्यामुळे नालासोपारा शहरात अनेक ठिकाणी पाणी साचून राहिले होते. तर विरार आणि नवघर माणिकपूर सह ग्रामीण भागातील काही गावांमध्ये पाणी तुंबले होते.
नालासोपारा मुख्य रस्ता आणि सेंट्रल पार्क रस्त्यावर, तसेच विरार व नवघर एसटी स्टँडमध्ये आजही पाणी तुंबून राहिल्याने वाहतुकीवर परिणाम होत आहे. प्रवाशांची गैरसोय होत होती. गास-सनसिटी रस्त्यावरील पाणी तुंबून राहिल्याने यामार्गावरील वाहतूक आजही बंद होती. तर वसई तालुक्याच्या पश्चिम पट्टीतील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने गावकऱ्यांची गैरसोय होत होती.
मुंबई-अहमदाबाद हायवेवर ससूनवघर जवळील काठीयावाड ढाब्यानजिक डोंगरावरुन प्रचंड प्रमाणात येत असलेल्या पाण्याचा निचरा होत नसल्याने त्याठिकाणी पाणी तुंबून राहिले आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक शनिवारपासून विस्कळीत झाली आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रशासनाने अद्याप कोणतीच पाऊले उचलली नसल्याने वाहतूक कोंडी होऊन चिंंचोटी फाटा ते घोडबंदर ब्रीज हे अवघ्या तीन-चार किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी एक-दीड तासाचा कालावधी लागत आहे. (वार्ताहर)
>मोडकसागर धरणाचे दोन दरवाजे उघडले
वाडा : मुंंबईला पाणी पुरवठा करणारे मोडकसागर धरण संततधार पावसाने भरले असून ओसांडून वाहू लागले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशरा देण्यात आला आहे.
सोमवारी रात्री १० वाजून २८ मिनिटांनी भरून वाहू लागल्याने धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आल्या असून वाडयातील चिरेवंगन, निशेत, कळंभे, शेले, सोनाळे, धापड, कापरी, कळंब, भोली, वडवली,बिलघर, तिळसे, कासघर, भोज, शिरसाड, पिंपरोली, जाळे, विलकोस, देसाई, तुसे, वाडा, सारशी, मालंदे, ऐनशेत, कोने, गांध्रे, शिरीषपाडा, सरसओहळ, ओबिस्ते खुर्द, टाकळीपाडा, बारोडा, आलमान, कोनसई, पिंगेपाडा, अंबई, पिंपळास, सिंधीपाडा, मोखाई, गोरे, दस्तुरी बुद्रुक, खुटलपाडा, आंबिस्ते बुद्रुक, या गावांना सतर्क राहण्याचा इशारा मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाड्याच्या तहसिलदारांना पत्राद्वारे देण्यात आला आहे.(वार्ताहर)
>धामणीचे पाचही दरवाजे उघडले
कासा : तालुक्यातील कासा भागात दोन दिवसापासून मुसळधार पाऊस झाल्याने धामणी धरण पूर्ण भरले आहे. त्याचे पाचही दरवाजे उघडल्याने सूर्या नदीला मोठा पूर आला असून काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
तालुक्यात आठवडाभरापासून सतत पाऊस सुरू असून दोन दिवसापासून पावसाचा जोर वाढला आहे.
अतिवृष्टीमुळे कासा परिसरातील नदी नाल्यांना मोठा पूर आला होता. मंगळवारी सकाळपासून खूप पाऊस झाल्याने कासा भागातील शाळा कॉलेजना सुट्टी देण्यात आली होती. तर कासा-चारोटी बाजारपेठेत ठिकठिकाणी पाणी साचले होते. आणि शुकशुकाट दिवसभर होता. तर खेडयापाडयातील कार्यालये, बँक व दवाखान्यातही खूपच कमी वर्दळ होती.
दरम्यान दोन दिवसापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे कासा जवळील सूर्या नदीवरील धामणी धरण पूर्णपणे भरले आहे. सोमवारी धरणाचे तीन दरवाजे उघडले होते. तर मंगळवारी संध्याकाळी तीन वाजता धरणाचे सर्व पाचही दरवाजे उघडले असून धरणाची पाणी पाताळी ११८.६० मी असून धरण पूर्णपणे भरल्याने पाण्याची पातळी आटोक्यात आणण्यासाठी १३००० क्युसेक (घन फू ट प्रति सेकंद) पाणी सोडल्याने सूर्यानदीला मोठा पूर आला आहे. त्यामुळे नाले, ओहोळ, यांनाही पूर आल्याने उर्से, साये, म्हसाड, पेठ, आदी ठिकाणच्या गावांचे मार्ग बंद पडले होते. त्यामुळे त्यांच्याशी असलेला संपर्क तुटला होता. (वार्ताहर)
>बोर्डीत रस्ते वाहतूक ठप्प
डहाणू/बोर्डी या प्रमुख राज्य मार्गावर कुंभारखाडी, चिखले , घोलवड गाव, बोर्डी खुटखाडी , झाई मोठातलाव आणि झाई गावातील रस्ते पाण्याखाली गेल्याने जनजीवन ठप्प झाले होते. जोरदार वारे आणि पावसाची संततधार इ. मुळे बोर्डी परिसरातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती. डहाणू बोर्डी मार्गावर व घोलवड विजयवाडी आणि बोर्डीतील आचार्य भिसे विद्यानगरी नजीक मार्गावर वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूक कोंडी झाली. दरम्यान डहाणू सार्वजनिक बांधकाम विभाग, बोर्डी वन विभाग, घोलवड पोलीस आणि तलाठी यांनी मार्ग मोकळा केल्याने रस्ता खुला झाला.
जोराची भरती असल्याने किनाऱ्याची अपरिमित हानी झाली. सुरु झाडांचे नुकसान झाले. बोर्डी परिसरातील गावांमध्ये दोन दिवस वीज खंडित असल्याने नागरिकांचे हाल सुरूच आहेत.
दरम्यान चिखले गावातील तलावाच्या बांधाला भगदाड पडल्याने आणि त्यामुळे विजेचा ट्रान्सफार्मर लगतचा मातीचा भराव खचू लागल्याने वीज खांब जमीनदोस्त होण्यासह तलावाला धोका निर्माण झाला होता.
यावेळी भर पावसात चिखले ग्रामस्थांनी श्रमदानाने माती, दगडांच्या साहाय्याने बांध घातल्याने प्रलय टळला. अन्यथा शेती आणि लगतच्या रहिवासी वस्तीला धोका निर्माण झाला असता. (वार्ताहर)

Web Title: In the Palghar district floods everywhere, the dams are filled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.