पालघर पोटनिवडणूक 2018: पालघरमधील मतमोजणीच्या चार फेऱ्या संशयाच्या फेऱ्यात; शिवसेनेची फेरमोजणीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 04:13 PM2018-05-31T16:13:39+5:302018-05-31T16:13:39+5:30
निवडणूक आयोगाने राजेंद्र गावित यांना विजयी घोषित करू नये.
ठाणे: शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. यामध्ये भाजपाच्या राजेंद्र गावित यांनी तब्बल 29 हजार मतांनी विजय मिळवला. यानंतर आता शिवसेनेने मतांची फेरमोजणी व्हावी, अशी मागणी केली आहे.
मतदानाच्या दिवसापासूनच शिवसेनेसह विरोधी पक्ष याठिकाणी मतदान यंत्रात (ईव्हीएम) बिघाड झाल्याचा आरोप करत आहेत. मात्र, निवडणूक आयोगाने शिवसेनेचा हा दावा फेटाळून लावला होता. त्यानंतर आज शिवसेनेचे पालघर जिल्ह्याचे सह-संपर्क प्रमुख केतन पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे मतांची फेरमोजणी करण्याची मागणी केली. 20,21, 22, 23 आणि 24 व्या फेरीत निवडणूक आयोगाने जाहीर केलेली मतदारांची आकडेवारी आणि आमच्याकडे असलेल्या माहितीमध्ये तफावत आढळून आली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने राजेंद्र गावित यांना विजयी घोषित करू नये. 20,21, 22, 23 आणि 24 फेरीतील मतांची पुन्हा मोजणी करूनच अंतिम निर्णय घ्यावा, अशी मागणी सेनेने केली आहे.
भाजपाचे उमेदवार राजेंद्र गावित पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होते. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यानंतर ते पिछाडीवर गेले आणि शिवसेनेचे श्रीनिवास वनगा दुसऱ्या क्रमांकावर आले. मात्र, वनगा यांना एकाही फेरीत गावित यांना मागे टाकता आलं नाही. गावित यांना दुपारी एकपर्यंत 2 लाख 37 हजारांपेक्षा जास्त मतं मिळाली. तर श्रीनिवास वनगा यांना 2 लाख 9 हजार मतं मिळाली.