भाजपा ते भाजपा व्हाया शिवसेना...! 'हा' नेता घरवापसी करून कमळ चिन्हावर लढणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 03:04 PM2024-04-08T15:04:33+5:302024-04-08T15:05:53+5:30
loksabha Election 2024: पालघर लोकसभा निवडणुकीत मागील वेळी राजेंद्र गावित हे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले. त्यानंतर पक्षफुटीनंतर गावित एकनाथ शिंदेंसोबत गेले. त्यात आता ही जागा पुन्हा भाजपाच्या वाट्याला जाण्याची शक्यता असल्याने राजेंद्र गावित घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत.
मुंबई - Palghar Loksabha Election ( Marathi News ) आगामी लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यापासून प्रत्येक पक्ष उमेदवारांची घोषणा करत आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांची घोषणा आणि प्रचार सुरू झाल्यानंतर आता इतर टप्प्यातील उमेदवार घोषित केले जात आहेत. महायुतीकडून अद्याप मुंबई, ठाणे, कोकणातील काही जागांवर उमेदवारांची घोषणा झाली नाही. त्यातच आता पालघर लोकसभा मतदारसंघातून नवी माहिती समोर येत आहे.
या निवडणुकीच्या आधी विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याची चिन्हे आहेत. गावित कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. ठाणे, कल्याण हा मतदारसंघ शिवसेनेला सोडल्यामुळे पालघर पुन्हा आपल्याकडे घेण्यासाठी भाजपा आग्रही आहे. त्यात येथील विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे सध्या शिंदे गटातील शिवसेनेत आहे. गावित यांना आपल्याकडे घेऊन कमळ चिन्हावर निवडणुकीला उभं केले जाऊ शकते.
राजेंद्र गावित हे सलग २ टर्म खासदार राहिले आहेत. त्यामुळे यंदा विजयाची हॅट्रिक करण्याची संधी गावितांकडे आहे. २०१८ मध्ये चिंतामण वनगा हे भाजपाचे खासदार होते. परंतु आकस्मित निधनानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. तेव्हा भाजपाने गावित यांना उमेदवारी दिली. तर शिवसेनेनं वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. परंतु राजेंद्र गावित या पोटनिवडणुकीत विजयी झाले होते.
२०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांच्यात युती झाली. तेव्हा जागावाटपात ही जागा भाजपाने शिवसेनेला दिली. परंतु त्यावेळी येथील खासदार राजेंद्र गावित यांना शिवसेनेत प्रवेश देत ठाकरेंनी त्यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे राजेंद्र गावित हे शिवसेनेचे खासदार बनले होते. आता गावित पुन्हा घरवापसी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपा ते भाजपा व्हाया शिवसेना असा राजेंद्र गावित यांचा प्रवास झाला असून कमळ चिन्हावर निवडणूक लढणारे ते पहिलेच खासदार असू शकतात. पालघरमध्ये उद्धव ठाकरे गटाने भारती कामडी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.