पालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 05:55 AM2018-05-28T05:55:01+5:302018-05-28T06:13:58+5:30

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी मतदान होणार आहे. येथील १८ लाख मतदार निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या एकूण ७ उमेदवारांपैकी कोणाच्या बाजूने कौल देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Palghar Lok Sabha by-election voting today | पालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

पालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

Next

- हितेन नाईक
पालघर  - पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी मतदान होणार आहे. येथील १८ लाख मतदार निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या एकूण ७ उमेदवारांपैकी कोणाच्या बाजूने कौल देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. श्रीनिवास वनगा (शिवसेना), राजेंद्र गावित (भाजपा), दामू शिंगडा (काँग्रेस), बळीराम जाधव (बविआ), किरण गहला (मार्क्सवादी) यांच्यामध्ये मुख्य पंचरंगी लढत होणार आहे.
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, २०९७ मतदान केंद्रांवर २८ मे रोजी मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीकरिता १२ हजार ८९४ कर्मचारी, तसेच ४ हजार २१९ सुरक्षा कर्मचारी तैनात असल्याची माहिती, निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली.
२०९७ केंद्रांपैकी १४ केंद्रे संवेदनशील असून, या केंद्रांकडे शासकीय यंत्रणेचे अधिक लक्ष राहणार आहे. पालघर लोकसभा क्षेत्रातील डहाणू विधानसभा क्षेत्रात ३२७, विक्रमगडमध्ये ३२८, पालघरमध्ये ३१८, बोईसरमध्ये ३३८, नालासोपारामध्ये ४४९ तर वसई विधानसभा क्षेत्रात ३२७ मतदान केंद्रे आहेत. यापैकी डहाणूमधील पतीलपाडा (६३), बोईसरमधील बोईसर (३४), धोंडीपूजा (८५), खैरपडा (२९४), तसेच वळीवमधील तीन केंद्रे, नालासोपारा विधानसभा क्षेत्रात निळेमोरे येथील पाच आणि आचोळे येथील दोन अशी एकूण १४ केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. मतदानाच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक, दोन अतिरिक्त पोलीस अधीक्षक, ९ उपविभागीय पोलीस अधिकारी, १८ पोलीस निरीक्षक, १८२ पोलीस उपनिरीक्षक, दोन हजार ६०२ पोलीस शिपाई, ४९५ नवीन भरती झालेले पोलीस, एक हजार ११७ होमगार्ड व ४६ नागरी सुरक्षा विभागाचे स्वयंसेवक यांना तैनात करण्यात आले आहे. मतदानासाठी २ हजार ७३७ मतदान केंद्र अध्यक्ष, ७ हजार ७३७ मतदान अधिकारी व २ हजार ३०८ शिपाई यांचा फौजफाटा असणार आहे.

भंडारा-गोंदियात आघाडी आणि भाजपात मुख्य लढत
भंडारा-गोंदिया येथे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी मतदान होत आहे. ३१ मे रोजी मतमोजणी होणार आहे. येथे भाजपाचे हेमंत पटले व आघाडीचे मधुकर कुकडे यांच्यात मुख्य लढत होत आहे.

Web Title: Palghar Lok Sabha by-election voting today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.