Palghar Mob Lynching: ...तर आधी मुख्यमंत्र्यांना घेराव घालू आणि मग गावात शिरू; नागा साधू आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 06:14 PM2020-04-20T18:14:45+5:302020-04-20T18:41:00+5:30
पालघरमध्ये जमावाकडून साधूंच्या झालेल्या क्रूर हत्येमुळे साधूसंत आणि आपल्या उग्र स्वभावासाठी परिचित असलेले नागा साधू संतप्त झाले आहेत.
नाशिक/मुंबई - कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू असतानाच पालघर जिल्ह्यातील एका गावात तीन साधूंच्या झालेल्या हत्येमुळे देशपातळीवर खळबळ उडाली आहे. दरम्यान, जमावाकडून साधूंच्या झालेल्या क्रूर हत्येमुळे साधूसंत आणि आपल्या उग्र स्वभावासाठी परिचित असलेले नागा साधू संतप्त झाले आहेत. महंतांची हत्या करणारे राक्षसच आहेत. त्यांना शिक्षा व्हायलाच हवी, तसे न झाल्यास मुख्यमंत्र्यांना घेराव घालू, गावात घुसू, अशी तीव्र भावना अखिल भारतीय आखाडा परिषद अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज लोकमतकडे व्यक्त केली.
अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज म्हणाले की,'पालघरमधील हत्याकांडाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कारवाईची अपेक्षा आहे. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसेल तर त्यांना घेराव घालू. त्यानंतरही त्यांनी काही केलं नाही, तर आम्ही आमची फौज घेऊन गावात शिरू,'' असा इशारा त्यांनी दिला.
'महंतांची हत्या करणारे राक्षसच म्हटले पाहिजेत. त्यांना शिक्षा व्हायलाच हवी. या प्रकारामुळे देशातील सर्व आखाड्यांचे महंत संतप्त झाले आहेत. महाराष्ट्र ही संतांची भूमी मानली जाते. मात्र आता महाराष्ट्रात साधू संत सुरक्षित नाही,'' अशा शब्दात अखिल भारतीय आखाडा परिषद अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज यांनी नाराजी व्यक्त केली.
चार दिवसांपूर्वी गुजरातमध्ये अंत्ययात्रेसाठी जात असलेल्या तिघा जणांना पालघरमधील एक गावात चोर असल्याच्या संशयावरून अडवले होते. तसेच गावातील जमावाने या सर्वांना पकडून मरेपर्यंत मारहाण केली होती. यात तीन जणांचा मृत्यू झाला होता.