पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 10:49 PM2024-05-02T22:49:06+5:302024-05-02T22:49:46+5:30
या जागेसाठी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात रस्सीखेच सुरू होती. आखेर, ही जागा मिळविण्यात भाजपला यश आले आहे.
पालघर लोकसभेची जागा अखेर भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात गेली असून, या जागेसाठी भाजपने दिवंगत माजी मंत्री विष्णू सावरा यांचे पुत्र हेमंत विष्णु सावरा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या जागेसाठी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात रस्सीखेच सुरू होती. आखेर, ही जागा मिळविण्यात भाजपला यश आले आहे. महत्वाचे म्हणजे, शिंदे गटातील राजेंद्र गावित हे येथील विद्यमान खासदार आहेत. यामुळे हा त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
पालघरमधून हेमंत सवरा यांना उमेदवारी मिळावी, यासाठी भाजप कार्यकर्ते आग्रही होते. यामुळेच त्यांना येथून उमेदवारी देण्यात आली आहे. येथे हेमंत सावरा यांची लढत ठाकरे गटाच्या भारती कामडी यांच्यासोबत असेल. मात्र, पालघर लोकसभा मतदारसंघात हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचीही चांगली ताकद आहे. बहुजन विकास आघाडीने येथून बोईसरचे आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर वंचित बहुजन आघाडीने विजया म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे.
पालघरमध्ये हेमंत सावरा यांच्या उमेदवारी बरोबरच राज्यातील लोकसभेच्या 28 जागां भाजपच्या पारड्यात गेल्या आहेत. शिंदे गटाच्या पारड्यात 15 जागा गेल्या आहेत. तर अजित पवारांच्या एनसीपीने चार जागांवर आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत.