पालघर द्या, भंडारा घ्या - उद्धव ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 06:14 AM2018-05-12T06:14:17+5:302018-05-12T06:14:17+5:30
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना सर्व पक्षांनी पाठिंबा देण्याची गरज आहे.
नागपूर : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना सर्व पक्षांनी पाठिंबा देण्याची गरज आहे. पाठिंब्यासाठी कोण पुढे येतो हे पाहूनच भंडारा-गोंदिया मतदारसंघात कोणाला पाठिंबा द्यायचा ते ठरवू, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यांचा रोख भाजपाकडे होता.
विदर्भातील शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी उद्धव ठाकरे शुक्रवारी नागपुरात आले होते. या वेळी पत्रकारांना ते म्हणाले, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीबाबात आम्ही ‘वेट अॅण्ड वॉच’ भूमिका घेतली आहे. पालघरमध्ये काय घडते, हे पाहून या मतदारसंघाची भूमिका जाहीर केली जाईल.
विदर्भ विकासाच्या विरोधात शिवसेना नाही. विदर्भाच्या विकासासाठी वेळ पडली तर शिवसेना रस्त्यावर उतरेल. परंतु विकास हवा म्हणून वेगळे राज्य द्या, असे म्हणणे योग्य नाही. विदर्भ हा महाराष्ट्राचाच भाग आहे. विदर्भाला तोडण्याची भाषा करणाºयांवर राजद्रोह दाखल करावा, या स्थानिक नेत्यांच्या भूमिकेचे ठाकरे यांनी समर्थन केले.
‘लोकमत’च्या पुढाकाराचे केले स्वागत
‘रिफायनरी’ प्रकल्प विदर्भात यावा, यासाठी ‘लोकमत’ने जनप्रतिनिधींना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. ‘लोकमत’मुळे या मागणीला पाठबळ मिळते आहे. हा चांगला पुढाकार आहे. नाणारला प्रकल्प होणार नाही हे निश्चित. त्यामुळे तो विदर्भात यायलाच हवा याचा पुनरुच्चारदेखील उद्धव ठाकरे यांनी केला.
तरच पावसाळी अधिवेशन नागपुरात घ्या
पावसाळी अधिवेशन नागपुरात घ्यायला आमचा विरोध नाही. मात्र हे अधिवेशन केवळ दिखाव्यासाठी असता कामा नये. राज्य व विशेषत: विदर्भासाठी चांगले निर्णय होणार असतील, तरच पावसाळी अधिवेशन उपराजधानीत घेण्यात यावे, असे ते म्हणाले. राहुल गांधी यांनी पंतप्रधान होण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, मला तरी पंतप्रधान व्हायचे नाही.