पालघरमधील गोदामात स्फोटकांचा साठा जप्त
By admin | Published: October 28, 2016 02:18 AM2016-10-28T02:18:48+5:302016-10-28T02:18:48+5:30
मुंबई - अहमदाबाद महामार्गालगत सातिवली गावाजवळील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका पडक्या इमारतीत स्फोटकांचा मोठ्या प्रमाणात साठा दडवून
- हितेन नाईक/आरिफ पटेल, पालघर
मुंबई - अहमदाबाद महामार्गालगत सातिवली गावाजवळील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका पडक्या इमारतीत स्फोटकांचा मोठ्या प्रमाणात साठा दडवून ठेवल्याची माहिती कळताच मुंबईतील काळाचौकी येथील दहशतवादविरोधी पथकाने छापा घालून डिटोनेटर, जिलेटीनच्या कांड्या अशी १४ ते १५ किलो वजनाची स्फोटके हस्तगत केली. या साठ्यामुळे येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या तारापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.
काही दिवसांपूर्वी दहशतवादी पथकाने ताब्यात घेतलेल्या एका आरोपीने पालघर जिल्ह्यातील महामार्गालगतच्या सातिवली गावाच्या हद्दीत निर्मनुष्य ठिकाणी या गोदामात स्फोटके दडवून ठेवल्याची माहिती दिली होती. त्याआधारे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी ७ वाजता या पडक्या इमारतीच्या परिसरात पोहोचले. त्यावेळी लहान लहान पाकिटांमध्ये ही स्फोटके खड्डे खणून दडविल्याचे आढळले. मात्र याबाबत कोणतीही अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला.
दहशतवादी पथकाचे मुंबई युनिटचे उपायुक्त धनंजय कुलकर्णी, अधिक्षिका शारदा राऊत, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी अशोक होनमाने आदींसह सुमारे १०० अधिकारी, कर्मचारी संध्याकाळी सात वाजेपर्यंत या ठिकाणी शोध घेत होते.
बेकायदेशीर गोदामे धोकादायक
आजवर अनेक स्फोटकांचा यशस्वी शोध घेणाऱ्या पोलिसांच्या श्वानपथकातील लकी आणि मोती या श्वानांनी हा साठा शोधला.
नवनिर्मित पालघर जिल्ह्यात प्रथमच बेवारस स्फोटके सापडल्याने हा जिल्हा दहशतवाद्यांच्या कारवाईचे लक्ष्य करण्याचा आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रीय महामार्गालगत आदिवासी तसेच खाजगी जमिनींवर
मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर गोदामे उभारण्यात आली असून त्यातून अनेक प्रकारची बेकायदेशीर कृत्ये केली जात आहेत. त्यामुळे घातपाती कारवायांसाठी अशा गोदामांचा वापर केला जात असल्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
सहा महिन्यांपासून साठा दडविला
मनोर पोलीस ठाण्याच्या वरई चौकीपासून सातिवलीमधील हे गोदाम अवघ्या ६०० फुटांवर असून त्या चौकीवर २४ तास पहारा असतानाही ही स्फोटके उतरवण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून हा साठा दडविल्याचे समजते.
त्यामुळे महामार्गालगतच्या पडक्या इमारती, अनधिकृत ढाबे, गोदामे यामुळे देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या गोदामात मागील अनेक महिन्यांपासून काही जणांचे वास्तव्य असल्याचे घटनास्थळावरील दगडाच्या चुली, ब्लँकेट्स, जुने
कपडे यावरून स्पष्ट होते.