पालघरचा विकास आराखडा मराठीत करा!

By Admin | Published: January 19, 2017 03:37 AM2017-01-19T03:37:10+5:302017-01-19T03:37:10+5:30

हरकती नोंदविण्यासाठी तो मराठीत प्रसिद्ध करण्यात यावा, अशी मागणी मनसे च्या उपजिल्हाध्यक्षानी नगररचना विभागाकडे केली आहे.

Palghar's development plan in Marathi! | पालघरचा विकास आराखडा मराठीत करा!

पालघरचा विकास आराखडा मराठीत करा!

googlenewsNext

हितेन नाईक,

पालघर-  शहराचा प्रारूप विकास आराखडा हा बिल्डर धार्जिण्या आणि स्थानिक गरीब रहिवासी, शेतकरी यांच्यावर अन्याय करणारा असल्याने त्यावर हरकती नोंदविण्यासाठी तो मराठीत प्रसिद्ध करण्यात यावा, अशी मागणी मनसे च्या उपजिल्हाध्यक्षानी नगररचना विभागाकडे केली आहे.
पालघर नगर परिषदेचा प्रारूप विकास आराखड्यातील जमीन वापर नकाशा हा प्रत्यक्ष सर्वेक्षण न करता बनविण्यात आला होता. तसेच आराखड्यात आरक्षणे टाकताना ती लहान शेतकऱ्यांच्या जमिनीवर टाकून बिल्डरांच्या जमिनी मात्र यातून बेमालूमपणे वगळण्यात आल्या होत्या. हा आराखडा तयार होत असताना २ ते ५० एकरच्या गृहसंकुलना मनमानीने परवानगी देण्यात आल्याच्या निषेधार्थ प्रारूप विकास आराखडा विरोधी संघर्ष समितीच्या वतीने विरोध केला जात होता. हा आराखडा शेतकरी व ग्रामस्थांवर अन्याय करणारा असल्याने तो रद्द करावा यासाठी टेभोंडे, अल्याळी, नवली, वेवूर, घोलविरा, गोठणपूर व परिसरातील ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, नगर रचना कार्यालयावर मोर्चे काढले होते. हा प्रारूप विकास आराखडा रद्द करावा यासाठी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही विधानसभेत आवाज उठविला तसेच स्थानिकांचा वाढता विरोध पाहता मुख्यमंत्र्यांनी यावर सकारात्मक तोडगा काढला जाईल, असे आश्वासन समितीला दिले होते. मात्र त्यांनीही या आराखड्याला १७ ते २३ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या राजपत्रात मंजूरी दिल्याने लोकांमध्ये संतप्त प्रतिक्रि या उमटल्या. यावर एका महिन्याच्या आत हरकती व सूचना मागविण्यात आल्याचे सांगून त्याचे नकाशे जनतेच्या अवलोकानार्थ नगरपरिषद व नगररचना कार्यालयात उपलब्ध करण्यात आल्याचे नमूद केले होते. मात्र प्रत्यक्षात जानेवारी संपत आला तरी त्या ठिकाणी नकाशा व अधिसूचना लावण्यात न आल्याचे आढळून आले.त्यावेळी शेतकऱ््यांनी त्याबाबत विचारणा केली असता नकाशाच उपलब्ध झाला नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सांगितले.
हा वादग्रस्त ठरलेल्या विकास आराखड्याला मंजुरी मिळाल्या नंतर नकाशा व अधिसूचना या इंग्रजी भाषेत प्रसिद्ध होणार आहे. गाव पाड्यात, खेड्यात राहणाऱ्या शेतकऱ्यांना, स्थानिकांना इंग्रजीचे ज्ञान नसल्याने त्यांना हरकती नोंदविणे अडचणीचे ठरणारे आहे. त्याचा गैरफायदा बिल्डर, धनदांडगे घेण्याची शक्यता असल्याने तो मराठीत प्रसिद्ध करावा, अशी मागणी जिल्हाउपाध्यक्ष आशिष मेस्त्री आणि सहकाऱ्यांनी मुख्याधिकारी आणि नगर रचनाकार थोरात यांच्याकडे केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Palghar's development plan in Marathi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.