पालखी सोहळ्याची जय्यत तयारी

By Admin | Published: June 27, 2016 01:05 AM2016-06-27T01:05:38+5:302016-06-27T01:05:38+5:30

संत तुकाराममहाराज यांची पालखी येत्या बुधवारी म्हणजेच २९ जून रोजी पुण्यात येत असल्याने शहरात वारकऱ्यांच्या स्वागतासाठी तयारी सुरू

Palkhi celebration world preparations | पालखी सोहळ्याची जय्यत तयारी

पालखी सोहळ्याची जय्यत तयारी

googlenewsNext


पुणे : महाराष्ट्राची परंपरा सांगणारी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराममहाराज यांची पालखी येत्या बुधवारी म्हणजेच २९ जून रोजी पुण्यात येत असल्याने शहरात वारकऱ्यांच्या स्वागतासाठी तयारी सुरू आहे.
एकीकडे राज्यात पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असून, पेरणी करून हा वर्ग वारीत सहभागी होणार आहे. शहराच्या मध्यवस्तीतील संत तुकाराममहाराजांची पालखी थांबते त्या निवडुंगा विठोबा मंदिरातील तसेच ज्ञानेश्वरमहाराजांची पालखी उतरते त्या पालखी विठोबा मंदिरातील पालखीची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.
मंदिराच्या बाजूच्या इमारतीत असणाऱ्या हॉलमध्ये या २ दिवसांत ४ ते ५ हजार वारकरी उतरत असल्याने हॉलचीही साफसफाई करण्यात आली. याबरोबरच अन्नदानाची भांडीही स्वच्छ करून ठेवल्याचे पाध्ये यांनी सांगितले.
पालखी काळात महानगरपालिकेतर्फे उत्तम प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे ते म्हणाले. यामध्ये मांडव, पाण्याची व्यवस्था, मोबाईल टॉयलेट, महावितरणतर्फे या भागातील विजेची सोय, जनरेटर अशा सर्व व्यवस्था उत्तम पद्धतीने करण्यात येतात. आरोग्य विभागातर्फेही या काळात विशेष साफसफाई व औषधफवारणी मोहीम राबविण्यात येत येते.
>कमानींची स्वच्छता
रविवारी मंदिराची डागडुजी, मांडव व इलेक्ट्रिसिटीचे काम अंतिम टप्प्यात आल्याचे चित्र होते. निवडुंगा विठोबा मंदिरातील पालखीची तयारी १० जूनपासून चालू झाल्याचे येथील पुजारी आनंद पाध्ये यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मंदिराच्या आवारातील सभामंडपात असणाऱ्या चांदी व पितळ्याच्या कमानी धुवून-पुसून घेण्यात आल्या आहेत. तसेच भिंती व बाजूचा परिसर साफ करण्याचे काम चालू असल्याचे दिसले.
>इंद्रायणीकाठी वैष्णवांचा मेळा
आळंदी : ‘माज्या जीवाचे आवडी... पंढरपुरा नेईन गुढी’ असे म्हणत मोठ्या भक्तिभावाने हाती भगव्या पताका, मुखाने हरिनामाचा व हाताने टाळ-मृदंगांचा गजर करीत लाखोंच्या संख्येने वारकरी आळंदीत दाखल झाले असून, माऊलींच्या नामघोषाने अवघी अलंकापुरी दुमदुमून गेली आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांच्या १८६व्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान मंगळवारी (२८ जून) होणार असून, सोहळ्यासाठी हजारो वारकरी दाखल झाले आहेत.
माऊलींच्या समाधी दर्शनासाठी वारकऱ्यांनी रविवारी गर्दी केली होती. ही रांग दीड किलोमीटरपर्यंत पोहोचली होती. यंदाच्या पालखी सोहळ्यात साडेचारशेच्या आसपास दिंड्या सहभागी होणार असून, त्या मागे वीस एक नव्याने सुरू झालेल्या नोंदणी नसलेल्या दिंड्या असणार आहेत. आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच कर्नाटक व इतर राज्यांतून विविध दिंड्या आळंदीत दाखल होऊ लागल्या आहेत. आळंदीत दाखल झालेले वारकरी इंद्रायणीत मोठ्या भक्तिभावाने स्नान करीत होते. दर्शनासाठी भक्तिसोपान पुलावरून दर्शनबारीची सोय केली आहे. गर्दी वाढल्याने ही रांग सुमारे दीड किलोमीटर गेली होती. यंदा नव्यानेच उभारण्यात आलेल्या दर्शनबारीमुळे भक्तांचे दर्शन सुखकर झाले आहे. वारकऱ्यांना पाणी व्यवस्थित व चांगले मिळावे, यासाठी नगरपालिकेच्या वतीने २४ तास पाणीपुरवठा करण्यात येत असून, पिंपरी-चिंचवड महापालिकेकडूनही काही भागात पाणीपुरवठा केला जात आहे. (वार्ताहर)
यंदा पंढरीची
वारी ‘आयटी’त
पुणे : आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण-तरुणींचा वारीत सहभाग वाढत असून, त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी रविवारी सिंहगड रस्त्यावरील विठ्ठल मंदिरात कार्यशाळा झाली़ दोन वर्षांपासून वारीमध्ये आयटी क्षेत्रात काम करणारे तरुण-तरुणी आयटी दिंडीच्या माध्यमातून सहभागी होत आहेत़ ज्याप्रमाणे वारकरी हरिनामाचा गजर करतात़ भजन करतात. तसे आयटी दिंडीतील सहभागी तरुणांना करता यावे, यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केले होते़ सहभागी तरुण-तरुणींना भजन करण्यास व लयीत टाळ कसा वाजवायचा शिकविण्यात आले़ ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल जल विठ्ठल निर्मल विठ्ठल...’ असा संदेश घेऊन ९०० जण यंदा वारीत सहभागी होणार आहेत़ ताणावात जगणाऱ्या आयटीयन्सना अध्यात्माचा आनंद मिळावा, या उद्देशाने दिंडी या सोहळ्यात सहभागी होणार आहे़
दागिन्यांना झळाळी देण्याचे काम
यावर्षीच्या वारीत निर्मल वारी म्हणजेच स्वच्छता अभियानावर भर असल्याने जास्तीत जास्त स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पालखी विठोबा मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष प्रमोद बेंगरुट म्हणाले. रंगरंगोटी अंतिम टप्प्यात आली असून, विठ्ठल-रुक्मिणीच्या दागिन्यांना झळाळी देण्याचे काम चालू होते. सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले असून, त्यांचे याठिकाणी टेस्टिंग चालू होते. या दोन प्रमुख मंदिरांबरोबरच शहरातील सामाजिक संस्था, गणेशोत्सव मंडळे यांच्याकडूनही वारकऱ्यांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात येते. मध्यवस्तीत ठिकठिकाणी अशाप्रकारची तयारी अंतिम टप्प्यात आल्याचे चित्र होते. त्यामुळे ज्ञानोबा, तुकाबांच्या पालख्यांसाठी व वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पुणेकर सज्ज असल्याचे दिसून आले.
>‘अतिथी देवो भव’ची संस्कृती
जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी देहूनगरीत दाखल होणारे भाविक म्हणजे ग्रामस्थांचे अथितीच असतात. ‘अतिथी देवो भव’च्या भारतीय संस्कृतीप्रमाणे देहूत वारकरी आणि भाविकांना अन्नदान करण्याची संस्कृती चांगलीच रुजली आहे. घरोघरी वारकऱ्यांना अन्नदानाची परंपरा असलेल्या गावातील काही मंडळे आता मोठ्या स्वरूपात आयोजन करीत आहेत. पालखी सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून आलेला भाविक, वारकऱ्यांना उपाशीपोटी झोपावे लागू नये, या विचारातून २३ वर्षांपूर्वी गावातील काही तरुणांनी गावातील हनुमान मंदिरात छोट्या प्रमाणात अन्नदान सुरू केले.

Web Title: Palkhi celebration world preparations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.