'येळकोट येळकोट जय मल्हार' च्या गजरात जेजुरीत 'श्रीं'चा पालखी व कऱ्हा स्नान सोहळा उत्साहात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 06:33 PM2020-12-14T18:33:21+5:302020-12-14T18:36:37+5:30
अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती अमावस्या यात्रा उत्सव
जेजुरी: महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती यात्रा आज भाविक भक्तांविना साजरी झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरून येणाऱ्या भाविकांना प्रवेश नाकारण्यात आला होता. मात्र देवाचे मानकरी, खांदेकरी व मोजक्याच ग्रामस्थांच्या उपस्थितीत पालखी सोहळा व कऱ्हा स्नान कुलधर्म कुळाचाराचे धार्मिक विधीत उत्साहात पार पडले.
अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत तथा बहुजन बांधवांचा लोकदेव असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाचा जत्रा यात्रा उत्सवातील महत्वपूर्ण समजला जाणारा सोमवती अमावस्या यात्रा उत्सव कोरोना महामारीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हाधिकारी पुणे यांच्या आदेशानुसार रद्द करण्यात आला. तसेच १२ डिसेंबर ते १४ डिसेंबर या तीन दिवसांच्या काळात राज्यातील भाविकांना जेजुरीत येण्यास मज्जाव करण्यात आला होता ,तसेच १४४कलमान्वये जमावबंदी आदेश लागू करण्यात येऊन शहरातील दुकानेही बंद ठेवण्यात आली होती .
गेल्या दहा महिन्यांच्या काळात जेजुरीतील तीन सोमवती उत्सव व विजयादशमीचा उत्सव रद्द झाल्याने निदान सोमवार (दि.१४) सोमवती यात्रेला तरी लाडक्या दैवताचे दर्शन घेता येईल अशी अपेक्षा भाविकांची होती .परंतु यात्रा रद्द करण्यात आल्याने राज्यातील नियमित सोमवती वारी करणाऱ्या खंडोबा भक्तांची निराशा झाली. सोमवारी(दि.१४) सोमवती उत्सवानिमित्त जेजुरी गडावर व कऱ्हा नदीतीरावर मोजक्या ग्रामस्थ ,पुजारी ,सेवेकरी ,मानकरी यांच्या वतीने खंडोबा -म्हाळसादेवी उत्सव मूर्तींना स्नान घालण्यात येऊन धार्मिक विधी करण्यात आले.
खंडोबा देवाच्या वर्षाकाठी दहा ते १२ यात्रा साजऱ्या केल्या जातात .यामध्ये सोमवारी अमावस्या आली की या यात्रेला सोमवती यात्रा म्हटली जाते. यादिवशी खंडोबा - म्हाळसादेवींच्या उत्सव मूर्ती गडकोट आवारातील मुख्य मंदिरातून पालखीतून कऱ्हा नदीतीरावर नेल्या जातात .यावेळी पालखी सोहळ्यापुढे सनईचा मंगलमय सूर ,अब्दागिरी ,छत्रचामरे ,निशाण व मानाचा अश्व असे असते सुमारे ५ की.मि. अंतरावर असलेल्या कऱ्हा नदीतीरी पापनाश तीर्थावर उत्सव मूर्तींना दही दूध व पाण्याने स्नान घातले जाते .व भंडाऱ्याची मुक्त उधळण होते .या धार्मिक विधीत राज्यातून आलेले भाविक आपल्या देव्हाऱ्यातील देवांचे टाक , मूर्तींसह स्नानाची पर्वणी लुटतात ,नगरातून प्रस्थान ठेवलेला पालखी सोहळा धालेवाडीकर ग्रामस्थ ,फुलाई माळीण कट्टा ,जानाईमंदिर कट्टा येथे स्थिरावत पुन्हा गडावर दाखल होतो .आणि रोजमुरा(तृणधान्य )वाटप होऊन सोहळ्याची सांगता होते, अशी सोमवती उत्सवाची शेकडो वर्षांची पौराणिक परंपरा आहे.
मात्र ,कोरोना महामारीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यातील सर्वच धार्मिकस्थळांच्या यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत.जेजुरीतही भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार यात्रा रद्द करण्यात आली. सोमवारी(दि.१४) सोमवती यात्रेनिमित्त जेजुरी गडकोट आवारातील मुख्य मंदिरात पहाटेच्या सुमारास मोजक्या ग्रामस्थ ,व मानकरी ,पुजारी ,विश्वस्त व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये विधिवत पूजा अभिषेक करण्यात आला. खंडोबा - म्हाळसदेवींच्या उत्सव मूर्ती पालखीत ठेवून मंदिर प्रदक्षिणा मारण्यात आली. यानंतर फुलांनी सजविलेल्या बसमध्ये उत्सामूर्ती कऱ्हा नदीतीरावर नेत सूर्योदयाच्या साक्षीने विधिवत मूर्तींना स्नान घालण्यात आले. हा सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. शहरात व गडावर जाणारे सर्व रस्ते बॅरिगेट्स लावल्याने बंद केल्याने व भाविकांना मज्जाव करण्यात आल्याने मोठी यात्रा असूनही नगर सुनेसुने वाटत होते. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने तीन दिवस बंद ठेवण्यात आली.
सोमवती यात्रेच्या धार्मिक विधींसाठी प्रमुख विश्वस्त प्रसाद शिंदे,पंकज निकुडे ,संदीप जगताप ,शिवराज झगडे ,अशोकराव संकपाळ ,राजकुमार लोढा ,पालखी सोहळ्याचे मानकरी वतनदार इनामदार राजेंद्र पेशवे ,सचिन पेशवे ,ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे ,ग्रामस्थ ,मानकरी ,पुजारी ,कर्मचारी उपस्थित होते. जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक ,उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर ,कैलास गोतपागर,व कर्मचारी वर्गाने चोख बंदोबस्त ठेवला होता.