पालखी मुक्कामी मेघडंबरी, बहुउद्देशीय इमारत
By admin | Published: September 22, 2016 02:05 AM2016-09-22T02:05:17+5:302016-09-22T02:05:17+5:30
संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्याच्या मुख्य मुक्कामासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले
बारामती / इंदापूर : जगद्गुरू संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्याच्या मुख्य मुक्कामासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले असून बुधवारी बारामती व इंदापूर तालुक्यात विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली.
बारामतीचे नगराध्यक्ष योगेश जगताप, प्रांताधिकारी हेमंत निकम, संतोष जाधव, तहसीलदार हनुमंत पाटील व मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी शहरातील विविध भागांची पाहणी करून उपलब्ध करावयाच्या सुविधांबाबत चर्चा केली. शहरातील वसंतराव पवार नाट्यगृह, शारदा प्रांगण, जळोची येथील बाजार आवार, हरिकृपानगर येथील ओपन स्पेस आदी ठिकाणी विविध कामे केली जाणार आहेत. त्याची पाहणी केली.
विविध भागांच्या पाहणीनंतर पालखी मुक्काम स्थळ विकास आराखड्याबाबत चर्चा करण्यात आली. या वेळी विभागीय आयुक्त चोक्कलिंगम यांनी प्रशासकीय बाबी पूर्ण करून तत्परतेने कामे मार्गी लावण्याबाबत सूचना केल्या. नगराध्यक्ष योगेश जगताप यांनी चोक्कलिंगम व राव यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. पालखी सोहळ्यासाठीच्या विकास आराखड्याअंतर्गत होणाऱ्या कामांसाठी बारामती नगर परिषदेच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही योगेश जगताप व नीलेश देशमुख यांनी दिली.(प्रतिनिधी)
पालखी मुक्काम स्थळाच्या विकास आराखड्यामुळे वारकऱ्यांसाठी अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत. पालखी सोहळ्यात येणाऱ्या वारकऱ्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये, याची काळजी यानिमित्ताने घेतली जाणार आहे.
इंदापूर शहरास भेट देऊन पालखी रिंगण सोहळा व मुक्काम तळाची पाहणी केली. या वेळी बारामतीचे माजी प्रांत संतोष जाधव, विद्यमान प्रांत हिंमतराव निकम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र रहाणे, कार्यकारी अभियंता अविनाश धोंडगे, तहसीलदार श्रीकांत पाटील, इंदापूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे सहायक अभियंता एल. बी. जाधव व पालखी सोहळ्याचे विश्वस्त होते. या वेळी त्यांनी रिंगण सोहळा होत असणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणाची व श्री नारायणदास रामदास हायस्कूलमध्ये होणाऱ्या मुक्कामाच्या स्थळाची पाहणी केली.
आजच्या दौऱ्यात मूळ ठिकाण, नियोजित ठिकाण सोई-गैरसोई यावर प्रारंभिक विचार झाला. रयत शिक्षण संस्थेच्या शेजारी दहा एकर क्षेत्र आहे ते सोयीस्कर आहे. त्यावर विचार होईल. (वार्ताहर)
>पालखी मार्ग व तळाचा विकास करणे हा मुख्य उद्देश आहे. गर्दी वाढणार असल्याने काही अनुचित प्रकारांना सामोरे जाण्याची वेळ वारकऱ्यांवर येऊ नये, यासाठी मुक्कामाच्या ठिकाणी शासनाच्या मालकीची किमान दहा एकर जागा शासन, विश्वस्तांच्या नावे घेऊन विकास करण्याचे धोरण आहे. यात मेघडंबरी, बहुउद्देशीय इमारत, अशी कामे केली जाणार आहेत. वर्षातील एक दिवस ती पालखी सोहळ्यासाठी, तर उर्वरित वर्षभर ती वेगवेगळ्या उपक्रमासाठी वापरली जाईल. ग्रामपंचायत अथवा इतर संस्थांकडून तिची देखभाल ठेवली जाईल.
- एल. बी. जाधव, अभियंता