FTII च्या सदस्यपदाचा पल्लवी जोशी यांचा राजीनामा
By admin | Published: July 7, 2015 02:45 AM2015-07-07T02:45:58+5:302015-07-07T02:45:58+5:30
अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) नियामक मंडळाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
पुणे : अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) नियामक मंडळाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. नियामक मंडळाचे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांच्याबरोबरच सदस्यांच्या नियुक्तीलाही एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी कडाडून विरोध केला आहे. त्यातून जोशी यांनी तीन दिवसांपूर्वी राजीनामा दिला.
केंद्राने एफटीआयआयच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान तर सदस्य म्हणून अनघा घैसास, शैलेश गुप्ता, नरेंद्र पाठक, राहुल सोलापूरकर, पल्लवी जोशी यांची नियुक्ती केल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. व्हिजन नसलेल्या व्यक्तींच्या केलेल्या या नियुक्त्या रद्द कराव्यात, या मागणीसाठी गेल्या २४ दिवसांपासून विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले आहे. या पार्श्वभूमीवर पल्लवी जोशी यांनी, ‘विद्यार्थीच नाखूश असतील तर त्या पदाचा काय उपयोग?’ अशी भूमिका जाहीर करीत नियामक मंडळाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. एफटीआयआयमध्ये सुरू असलेल्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने काही दिवसांपूर्वीच चर्चेसाठी विद्यार्थी प्रतिनिधींना निमंत्रित केले होते. मात्र नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहानच राहतील या निर्णयावर केंद्र सरकार ठाम राहिल्याने ही चर्चा फिसकटली. हे सर्व वातावरण पाहता विद्यार्थ्यांच्या हितासाठी पल्लवी जोशी यांनी नियामक मंडळाच्या सदस्यपदाचा राजीनामा देणे पसंत केले आहे.
------------
शासनाची जबाबदारी जशी चांगले अभियंते घडविण्याची आहे, तशीच ती कलाकार आणि तंत्रज्ञ घडविण्याचीदेखील आहे. एफटीआयआयमध्ये कोणती तरी उमेद घेऊन येणाऱ्या मुलांचे पंख छाटण्याचे काम आपण करू नये. आम्ही केवळ फिल्म इंडस्ट्रीजचे ‘ड्रीम मर्चंट’ आहोत. पण आमच्या नियुक्तीमुळे विद्यार्थीच नाखूश असतील तर त्या पदाचा काय उपयोग? - पल्लवी जोशी