पॅनकार्ड क्लबपीडित सेबीवर धडकणार
By admin | Published: July 6, 2017 05:05 AM2017-07-06T05:05:31+5:302017-07-06T05:05:31+5:30
पॅनकार्ड क्लब लिमिटेड या मल्टीलेव्हल मार्केटिंग कंपनीकडून फसवणूक झालेल्या लाखो गुंतवणूकदारांनी एकत्रित येत, लढा देण्यासाठी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पॅनकार्ड क्लब लिमिटेड या मल्टीलेव्हल मार्केटिंग कंपनीकडून फसवणूक झालेल्या लाखो गुंतवणूकदारांनी एकत्रित येत, लढा देण्यासाठी इन्वेस्टर्स फोरम चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली आहे. या फोरमतर्फे सेबीवर दबाव निर्माण करण्यासाठी आॅगस्ट महिन्यात मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाआधी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सभा आणि मोर्चे निघणार असून, त्याची सुरुवात ९ जुलैला नाशिकमधून होणार आहे.
बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ विश्वास उटगी यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. उटगी म्हणाले की, सेबीने केलेल्या चौकशीत ५१ लाख गुंतवणूकदारांची ७ हजार ०३५ कोटी रुपयांची देणी कंपनीकडे थकीत आहेत. देशासह विदेशातील ४४ हॉटेलमध्ये वास्तव्य आणि सव्वासहा वर्षांत रक्कम दुप्पट करण्याचे आमिष दाखवत कंपनीने ही रक्कम गोळा केली. १९९७ साली सुरू झालेल्या या कारभाराला २०१२ सालानंतर वाच्यता फुटली. त्यानंतर प्रथम सेबी आणि अपिलीय लवादाने पॅनकार्ड क्लब कंपनीला गुंतवणूकदारांचे पैसे व्याजासह परत करण्याचे आदेश मे २०१७ मध्ये दिले. मात्र त्यानंतर कोणतीही कार्यवाही होत नसल्याने गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवण्यासाठी हा लढा सुरू केल्याचे उटगी यांनी सांगितले. या लढ्यात सेबीने तपास यंत्रणांना आदेश देऊन कंपनीच्या मालमत्तांवर टाच आणून गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून द्यावेत, ही प्रमुख मागणी आहे. बहुतेक गुंतवणूकदार हवालदिल होऊन सेबीकडे अर्ज करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सर्व गुंतवणूकदारांनी फोरमकडे नोंदणी करून सेबीकडे दाव्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन उटगी यांनी केले आहे. दावा दाखल करण्यासाठी फोरमच्या केईएम रुग्णालयासमोरील पित्तलवाला इमारतीतील कार्यालयात सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान उपलब्ध होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
टिष्ट्वंकलवरही बंदी
सिट्रस चेक इन्स, रॉयल टिष्ट्वंकल स्टार क्लब लिमिटेड आणि त्यांच्या संचालकांवर संशयास्पद योजना चालवण्याप्रकरणी सेबीने बंदी घातली आहे. शिवाय कंपनीच्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. एनसीएलटीने इन्सॉलव्हन्सी प्रोफेशन म्हणून सीए देवेंद्र जैन यांची नियुक्ती कंपनीचा ताबा मिळवण्यासाठी केली आहे.