जिजाऊंच्या राजवाड्यातून पंचधातूची तोफ चोरीला!
By admin | Published: December 24, 2014 12:25 AM2014-12-24T00:25:30+5:302014-12-24T00:25:30+5:30
पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष : मागील बाजूस पूर्वेकडे आढळल्या खुणा.
सिंदखेडराजा (जि.बुलडाणा) : राष्ट्रमाता जिजाऊंच्या राजवाड्यामध्ये पुरातत्व विभागांतर्गत उभारण्यात आलेल्या शासकीय वस्तू संग्रहालयामधून सोळाव्या शतकातील पंचधातूंची ८५ किलो वजनाची तोफ चोरीस गेल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला.
सिंदखेडराजा या राजधानीमधून राजे छत्रपती लखोजीराव जाधव हे सोळाव्या शतकामध्ये राज्यकारभार करीत होते. सिंदखेडराजा येथून आडगावराजा, देऊळगावराजा, किनगावराजा व मेहुणाराजा ही प्रत्येकी चारही गावे १३ किमी अंतरावर आहेत. या गावांमध्ये शत्रूने आक्रमण केल्यास संरक्षणार्थ सिंदखेडराजा येथील राजवाड्यातून भुयारी मार्ग असल्याचे पुरावे आहेत. २0 वर्षांपूर्वी अडगावराजा येथील गढीचे खोदकाम करताना पंचधातुच्या ८ तोफा सापडल्या होत्या. सर्व तोफा किनगावराजा पोलिस ठाण्याच्यावतीने सिंदखेडराजा येथील राजवाड्यात जमा करण्यात आल्या. त्यापैकी ६ तोफा कमी वजनाच्या असल्यामुळे राजवाड्याच्या वरच्या मजल्यावर ठेवण्यात आल्या आहेत. ८५ किलो वजनाच्या २ तोफा लाकडी गाळ्यावर राजवाड्यामध्ये प्रथमदर्शनी शासकीय वस्तुसंग्रहालयामध्ये पर्यटकांसाठी ठेवण्यात आल्या होत्या. तेथे पुरातत्व विभागाचे कर्मचारी पहारा देतात. २२ डिसेंबर रोजी पुरातत्व विभागाचे पहारेकरी रमेश पुंजाजी जाधव हे सुटीवर होते. त्यामुळे शासकीय वस्तु संग्रहालयाचे कनिष्ठ लिपीक राहुल कारभारी सरकटे यांनी २२ डिसेंबर रोजी सायंकाळी राजवाडा बंद करुन समोर कुलूप लावले. २३ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता राजवाडा उघडला, तेव्हा एक तोफ चोरीला गेल्याचे राहूल सरकटे व रमेश जाधव यांच्या निदर्शनास आले. त्यांनी सिंदखेडराजा पोलिस स्टेशनला कळविले. पोलिसांनी राजवाड्यात घटनास्थळाची पाहणी केली असता सदर तोफ राजवाड्याच्या मागच्या भागातील पूर्वेकडील कोपर्यामधून चोरट्यांनी लंपास केल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत. राहुल सरकटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सिंदखेडराजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात तपास करण्यासाठी बुलडाणा येथील श्वानपथकाला माहिती दिली. परंतु हे पथक उपलब्ध नसल्यामुळे अकोला येथील श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.
*पुरातत्व विभाग वा-यावर
पुरातत्व विभागांतर्गत ३ पदे मंजूर आहेत. त्यामध्ये १ उपअवेक्षक व २ पहारेकरी यांचा समावेश आहे. परंतु येथील राजवाड्यामध्ये रमेश जाधव हे एकच पहारेकरी कार्यरत आहेत. शासकीय वस्तु संग्रहालयामध्ये सुद्धा तीन पदे मंजूर असून, त्यातही एक पद रिक्त आहे. तसेच अभिरक्षक म्हणून असलेले डॉ. एम. वाय. कठाणे यांच्याकडे सिंदखेडराजा बरोबर पैठण येथील पदभार असल्यामुळे ते नेहमी गैरहजरच राहत असल्याचे दिसून येते.